'त्या' महिलेचे दाऊदशी संबंध, तिला आदित्य ठाकरेंनी पाठिशी घातलं; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप

'त्या' महिलेचे दाऊदशी संबंध, तिला आदित्य ठाकरेंनी पाठिशी घातलं; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप

मुंबई । Mumbai

दिशा सालियन प्रकरण पुन्हा उकरून काढल्यामुळं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे शिवसेनेच्या रडारवर आले आहेत. शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं केलेल्या लैंगिक अत्याचार व मानसिक छळाच्या तक्रारीची दखल घ्यावी व या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेनं केली. शिवसेनेच्या या मागणीनंतर राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून शिवसेनेसह राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहे.

राहुल शेवाळे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाचं दाऊदशी संबंध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. नवाब मलिक हे दाऊदशी संबंधित असल्याबाबत जेलमध्ये आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाचा तपास NIA कडून करावा. ज्यावेळी महाविकास आघाडी होती तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण प्रकरणाची कल्पना होती. त्यांनी अनिल परब यांना माझी बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशनला पाठवलं होतं. जर मी दोषी असतो तर त्याचवेळी माझ्यावर कारवाई झाली असती. माझी बाजू सत्याची असल्याने मला काही झाले नाही. परंतु मी AU नाव लोकसभेत घेतले त्यामुळे हे प्रकरण पुन्हा उचलून धरले. या प्रकरणाचा तपास NIA माध्यमातून व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

माझा संसार कसा खराब होईल तसेच माझे राजकीय आयुष्य कसे नष्ट होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेची आई दिल्लीमध्ये कॅब्रे डान्सर होती. त्या महिलेच्या वडिलांचा गुन्हेगारी इतिहास आहे. याबाबत दिल्ली पोलीस ठाण्यात माहिती उपलब्ध आहे. या महिलेचा एक भाऊ तुरुंगात आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात तो तुरुंगवास भोगत आहे. या महिलेचा दुसरा भाऊ ड्रग्ज तस्करी करतो. या महिलेची बहीण माहीम येथे बार गर्लचं काम करते. माझ्यावर तक्रार करणाऱ्या महिलेच्या पूर्ण कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास आहे. या माहितीला दिल्ली पोलिसांनी दुजोरा दिला आहे, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

या महिलेला आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे माझ्या दुबईच्या रेहमान या मित्राने मला या महिलेला मदत करण्यास सांगितले होते. ही महिला करोनाकाळात भारतात अडकली होती. त्यामुळे तिला मदत करावी असे मला रेहमानने सांगितले होते. करोना काळात मी अनेकांना मदत केली. त्याचप्रमाणे मी या महिलेलाही मदत केली. मात्र नंतरच्या काळात या महिलेची अपेक्षा वाढत गेली. या महिलेने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जेव्हा मी पैसे देण्याचे थांबवले तेव्हा या महिलेने खोटे फोटो दाखवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com