पिंपरी चिंचवड l Pimpari Chinchwad

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी ‘हम दो और हमारे दो’ म्हणत चार लोक देशाला चालवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि 'हम दो-हमारे दो'ची अंमलबजावणी करावी असा रामदास आठवले यांनी लगावला आहे. तसेच, राहुल गांधींचा जो आरोप आहे. हम दो हमारे दो..या आरोपामध्ये तथ्यता नाही. राहुल गांधी हे शेतकरी आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत” असे रामदास आठवले म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच, दिल्लीतील शेतकरी आंदोलन वाढवत आहेत. सरकार चर्चेला तयार आहे. पण, कायदेच मागे घ्या, ही आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांची ही भूमिका असंवैधानिक आहे. तसेच २०० शेतकऱ्यांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे शेतकरीच जबाबदार आहेत. तिरंग्याचा अपमान दुर्दैवी आहे. याच बरोबर नवडणूक काळात काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात कृषी कायद्याचे आश्वासन दिले होते, याची आठवणही आठवले यांनी करून दिली.

त्याचबरोबर, आरोप प्रत्यारोप चालले आहेतच. सर्व विरोधक एकवटले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरातील शेतकरी कायद्याच्या विरोधात नाहीत. पंजाब, हरियाणा येथील शेतकरी विरोध करत आहेत. मूळ शेतकरी आंदोलनात आलेला नाही असे रामदास आठवले म्हणाले.

जातीच्या आधारावर २०२१ची जनगणना करावी

महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात अगोदर मी केलेली आहे. मी ग्रामीण भागातून आल्याने माहीत होतं की, सर्व मराठा समाजातील बांधव हे श्रीमंत नाहीत. गरीब असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गरीब असणाऱ्या मराठा समाजातील व्यक्तींना, अल्पभूधारकांना आरक्षण मिळालं पाहिजे. या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकून वाद निर्माण करण्यापेक्षा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. ही मागणी मराठा समाजाची आहे. ओबीसींना आरक्षण कमी मिळाले आहे. त्यात मराठा समाजाला टाकून वाद निर्माण करण्यापेक्षा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

आरक्षणा संबंधी कायदा करायचा असेल तर एकट्या मराठा समजला करता येणार नाही. महाराष्ट्रातील मराठा, हरियाणातील जाट, राजस्थानमधील राजपूत, यूपीमधील ठाकूर, आंध्रप्रदेश येथील रेड्डी आहेत. या सर्व क्षत्रिय जातींना १०-१२ टक्के आरक्षण देण्याची मागणी माझ्या पक्षाने केली आहे. यातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल. २०२१ चा जनगणनेचा सर्वे हा जातीच्या आधारावर करावा, यासंबंधी पंतप्रधानांना मी पत्र देणार आहे. जातीच्या आधारावर जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. ग्रामीण भागात आजही दलितांवर अत्याचार होत आहेत. दलितांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी आहे” असे आठवले म्हणाले.