
दिल्ली | Delhi
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वडील राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर थेट भारत-चीन सीमेवरुन निशाणा साधत मोठा दावा केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, मला इथल्या लोकांनी सांगितलं, चीनचं सैन्य भारतीय सीमेत घुसलं आहे. दुसऱ्या बाजूला आपलं सरकार आणि आपले पंतप्रधान दावा करत आहेत की आपली एक इंचही जमीन गेलेली नाही. इथले लोक त्यांच्या गायी-म्हशींना ज्या ठिकाणी चरण्यासाठी घेऊन जात होते ती जमीन (चरई क्षेत्र) चीनने बळकावली आहे. त्यामुळे हे लोक तिकडे त्यांची जनावरं नेऊ शकत नाहीत. लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. परंतु, जनतेचं गाऱ्हाणं सरकार ऐकत नाही, आम्ही ते ऐकून घेऊ. असंही राहुल म्हणाले. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला असून यामुळे स्थानिक समाधानी नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी लेह ते केंद्रशासित प्रदेश लडाखमधील पँगॉन्ग सरोवरापर्यंत मोटारसायकलवरून प्रवास केला. ते लडाखच्या दौऱ्यावर आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजन झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. राहुल गांधी पुढील आठवड्यात कारगिलला भेट देण्याची शक्यता आहे. राहुल गांधी रविवारी मोटारसायकलवरून नुब्रा व्हॅलीतकडे निघणार आहेत. वाटेत राहुल गांधी दुकानदार आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेऊ शकतात. राहुल गांधी हे सोमवारी लेहला परतणार आहेत.