इंदिरा गांधींच्या आणीबाणीबाबत राहुल गांधींचे मोठे वक्तव्य, म्हणाले..

'आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक, पण...'
इंदिरा गांधींच्या आणीबाणीबाबत राहुल गांधींचे मोठे वक्तव्य, म्हणाले..

दिल्ली l Delhi

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं ते देखील चुकीचं होतं असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात प्रसिद्द अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे. तसेच आणीबाणी चुकीची होती सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळे असल्याची टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली.

राहुल गांधी यांनी म्हंटल आहे की, 'माझ्या मते ती एक चूक होती. त्यावेळी जे घडलं ते नक्कीच चूक होतं. पण, आजच्या काळात जे घडत आहे ते एकदम वेगळं आहे. त्यावेळी काँग्रेसनं संस्थात्मक पाया ताब्यात घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आमच्या पक्षाचा असलेला लोकशाही गाभा त्याला परवानगी देत नाही. आमची तसं करण्याची इच्छा असेल तरी आम्ही ते करु शकत नाही.'

तसेच ते पुढे म्हणाले की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काम वेगळ्या पद्धतीनं पूर्ण करत आहे. संघाकडून घटनात्मक पदावर त्यांची माणसं भरली जात आहेत. आम्ही निवडणुकीत भाजपाला हरवलं तरी या लोकांना काढू शकत नाहीत.' अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. त्याचबरोबर, 'आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. चर्चेवेळी माईक बंद केला जातो. लोकशाहीवर मोठा हल्ला होतोय. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीत राज्यपालांनी अनेक विधेयकं मंजूर होऊ दिली नाहीत. कारण ती आरएसएसशी संबंधित होती. भारतात आता हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ दरम्यान २१ महिने आणीबाणी लावली होती. याआधी २०१९ लोकसभा निवडणुकीतदेखील राहुल गांधींनी एका मुलाखतीत आणीबाणी चुकीची होती सांगत माफी मागितली होती. तर २४ जानेवारी १९७८ रोजी महाराष्ट्रातील एका रॅलीत इंदिरा गांधी यांनी जाहीरपणे माफी मागितली होती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com