मोदींची हिटलरशी तुलना, RSS चा उल्लेख; राहुल गांधींचा हल्लाबोल

मोदींची हिटलरशी तुलना, RSS चा उल्लेख; राहुल गांधींचा हल्लाबोल

दिल्ली | Delhi

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसतर्फे देशभरात निषेध केला जात असून, आज सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

'भारतात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशातील काँग्रेसनं मागील सत्तर वर्षांत जे कमावलं ते भाजपानं आठ वर्षात संपवलं आहे. सध्या केंद्र सरकारवर टीका करण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. लोकशाहीची सुरु असलेली हत्या जनता पाहत आहे. सरकार विरोधात बोलल्यानंतर कारवाई सुरु आहे हे लोकशाहीला घातक आहे,' असा घणाघात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला.

तसेच, सध्याच्या घडीला देशातील सर्व यंत्रणा सरकारला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे, या संस्थांमध्ये भाजपने आपले लोक बसवून ठेवले आहेत. निवडणूक आयोगापासून ते न्यायपालिकेपर्यंत एकही यंत्रणा आताच्या घडीला स्वायत्त राहिलेली नाही. प्रत्येक संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत. त्यामुळे काँग्रेस फक्त एका राजकीय पक्षाशी लढत नाही, तर संपूर्ण व्यवस्थेशी लढत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

'आमच्या सरकारच्या काळात या सगळ्या संस्थांचे इन्फ्रास्ट्रक्टर हे न्युट्रल असायचे. आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करायचो नाही. त्यावेळची लढाई ही दोन ते तीन राजकीय पक्षांमधील होती. पण सध्या सरकारी संपूर्ण संस्थात्मक यंत्रणा एका पक्षासोबत आहे. कोणीही दुसऱ्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला की त्याच्यापाठी ईडी आणि सीबीआय लागतात. त्यांना धमकावले जाते, घाबरवले जाते. त्यामुळे देशात सध्या राष्ट्रीय स्वयसंसेवक संघाची आर्थिक आणि संस्थात्मक एकाधिकारशाही आहे,' असे राहुल गांधी यांनी म्हटले.

तसेच, हिटलरने सर्व निवडणुका जिंकल्या होत्या. या निवडणुका त्याने कशा जिंकल्या? त्याने जर्मनीतील सर्व संस्थांवर ताबा मिळवला होता. तुम्ही माझ्या हातात संपूर्ण यंत्रणा द्या, मग मी तुम्हाला निवडणुका जिंकवून दाखवतो, अशा शब्दांत अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना लक्ष्य केले.

संयुक्त राष्ट्रांना खोटं ठरवण्यापर्यंत केंद्र सरकारची मजल गेली आहे. देशात दिवसेंदिवस महागाईचे आकडे वाढत आहेत. वाढते महागाईचे आकडे अर्थमंत्र्यांना दिसत नाहीत का?, असा सवालही त्यांनी यावेळी केली आहे. कोरोना काळातील मृत्यूची आकडेवारी केंद्राकडून लपवली का जाते? स्टार्टअप इंडिया कुठे आहे? असेही काही सवाल त्यांनी मोदी सरकारला केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com