राहुल गांधींना धक्काबुक्की; विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया

jalgaon-digital
4 Min Read

दिल्ली | Delhi

हाथरस येथे एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. तिच्यावर उपचार सुरु होते, मात्र तिचा मृत्यू झाला. आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही हाथरस या ठिकाणी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पोहचले. त्यावेळी त्यांना अडवण्यात आलं. एवढंच काय राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप झाला. पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू दिलं गेलं नाहीच. शिवाय पोलिसांनी हस्तक्षेप करत पायी येणाऱ्या राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला संताप

शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातोय.”

लोकप्रतिनिधीची कॉलर धरणे योग्य आहे का? – खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, “ही घटना अतिशय निंदाजनक असून मी त्याचा जाहीर निषेध करते. कोणतंही प्रशासन असो बलात्कार ही लाजिरवाणी गोष्ट आहे. फास्ट ट्रकमध्ये खटला झाला पाहिजे. राहुल गांधी हे खासदार आहेत ते कुठेही जाऊ शकतात. योगी सरकारचा जाहीर निषेध करते. ही कृती सरकारने केली हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी केली पाहिजे. लोकप्रतिनिधीची कॉलर धरणे योग्य आहे का?”

रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली – जयंत पाटील

राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, “महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची. रामाचं नाव घ्यायचं आणि कृती नथुरामाची करायची ही भाजपची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली आहे. हाथरसमधील पीडीत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे. भाजपने ज्या पध्दतीने उत्तर प्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे, नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल.”

धक्काबुक्की अत्यंत निंदनीय आणि लोकशाहीचा गळा घोटणारी – अशोक चव्हाण

हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची विचारपूस करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी जात होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेली धक्काबुक्की अत्यंत निंदनीय आणि लोकशाहीचा गळा घोटणारी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली असं कधी महाराष्ट्रात घडणार नाही – खासदार संजय राऊत

राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली असं कधी महाराष्ट्रात घडणार नाही. एखादी नटी सोबत मीडिया घेऊन जाते व एक गरीब मुलीचं कुटुंब आक्रोश करतो तेव्हा ते जगाला कळू नये यासाठी दडपशाही केली जाते. त्या मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेशातून कोणी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असेल तर इथून आम्ही यावर टिप्पणी करणं योग्य नाही. पण योगींचा राजीनामा मायावतींनी मागून उपयोग नाही, त्यांचा राजीनामा रामदास आठवले यांनी मागितला पाहिजे तर त्याला अर्थ आहे.

या दंडेलशाहीचा मी तीव्र निषेध करते – मंत्री यशोमती ठाकूर

राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर संतप्त झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा खुन होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *