पंजाबमध्ये नेमकं चाललंय काय?; मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचा काँग्रेस हायकमांडचा आदेश?

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

पंजाब काँग्रेसमध्ये (Punjab Congress crisis) पुन्हा एकदा धुसफूस सुरु झाली आहे. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत चालला असून आता पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder Singh) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrinder Singh) यांच्याविरोधात ४० आमदारांनी आवाज उठवला आहे. त्यानंतर आज आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून त्याआधी कॅप्टन अमरिंदर सिंग (CM Captain Amrinder Singh) त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची दुपारी बैठक घेणार आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यातील संघर्ष आता थेट सुरु झाल्याचं दिसत आहे. यात सिद्धू समर्थक आमदारांकडून दिल्लीत नाराजी व्यक्त केल्यानंतर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे आता पंजाबमध्ये खांदेपालट होणार अशी चर्चाही सुरु आहे.

पंजाबमध्ये आज होणारी आमदारांची बैठक ही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासाठी अडचणीची ठरु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहणं बंधनकारक आहे असा आदेश पक्षाकडून देण्यात आला असून त्यासाठी पर्यवेक्षक म्हणून हरीश रावत आणि अजय माकन उपस्थित राहणार आहेत.

२०२२ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पंजाबात राजकीय वातावरण गरम आहे. त्यात पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे थेट दोन गट पडले आहेत. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षातच आव्हान दिलं आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून सिद्धू यांची वर्णी लावून काँग्रेस हायकमांडनेही सिद्धूच्या पारड्यात वजन टाकलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नवज्योत सिद्धू हे काँग्रेसचा चेहरा असतील असं बोललं जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *