Thursday, April 25, 2024
Homeराजकीयपुणे : भाजपात पक्षांतर्गत नाराजीला फुटले तोंड

पुणे : भाजपात पक्षांतर्गत नाराजीला फुटले तोंड

पुणे | प्रतिनिधी | Pune

भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांची पक्षाने पुणे जिल्हा महिला मोर्च्याच्या अध्यक्षपदी निवड केल्यानंतर पक्षांतर्गत नाराजीला तोंड फुटले आहे. नाराज झालेल्या भाजपच्या विविध आघाड्यांच्या

- Advertisement -

पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र त्यामुळे सुरु झाले आहे. कांचन कुल यांनी सुप्रिया सुळेंविरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती.

कांचन कुल यांच्या निवडीला विरोध दर्शवत पक्षाच्या जिल्हा सचिव पूनम चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सूपूर्द केला आहे. भारतीय जनता पक्ष हा इतर पक्षांपेक्षा नेहमी वेगळा राहिलेला आहे. नेते-कार्यकर्त्यांची कामे पाहून खरं तर निवडी व्हायला हव्यात. मात्र सध्या तसं होताना दिसून येत नाही. आमचा कांचन ताईंना विरोध नाही मात्र सध्याच्या घटना पाहता भाजपच्या तत्वालाच हरताळ फासला जातोय, असं पूनम चौधरी म्हणाल्या.

दरम्यान, काल ज्या निवडी झाल्या त्याचे नेमके निकष काय होते आणि कोणतं मूल्यमापन करून पक्षाने त्यांच्या निवडी केल्या हा प्रश्न मला पडल्याचं चौधरी म्हणाल्या. राजीनाम्यावर ठाम असलो तरी पक्षकार्य थांबवलेलं नाही, असंही त्या म्हणाल्या.

कामगार आघाडीचे गायकवाड यांचाही राजीनामा

दरम्यान, दुसऱ्या राजकीय घडामोडीत पुण्यामध्ये हवेलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड आणि त्यांच्या पत्नी गौरी गायकवाड यांनी सर्व पदांसोबत भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गायकवाड दाम्पत्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेडगे यांच्याकडे राजीनामा सूपूर्द केला आहे. गायकवाड दाम्पत्य हे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे कट्टर कार्यकर्ते मानले जायचे. त्यामुळे या दोघांच्या राजीनाम्यामुळे हवेलीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जातंय.

माजी पालकमंत्री आणि खासदार गिरीष बापट यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये स्वतःला किंवा पत्नीला कोणतंही पद मागितलं नव्हतं. तर गेल्या पाच वर्षांत स्थानिक पंचायत समिती, जिल्हा समिती तसंच विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत ज्या पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केलं होतं त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्यांना ताकद द्या, असं सांगूनही पक्षविरोधी काम करणाऱ्यांना विविध पदांवर नियुक्त केलं,” असा आरोप गायकवाड दाम्पत्याने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या