शेतमाल व्यापार स्वातंत्र्य देणार्‍या अध्यादेशाला शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा

२४ ऑगस्ट रोजी तहसिलदारांना देणार निवेदन
अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना
अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना

श्रीगोंदा | Shrigonda

शेतीमाल व्यापार सुधारणां संबंधी केंद्र शासनाने पारित केलेल्या अध्यदेशाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना राज्यभरातील तहसील कार्यालयात पाठिंब्याचे निवेदन देणार आहे. स्वातंत्र्य विरोधी शक्तींच्या दबावाला बळी पडुन अध्यादेश मागे घेऊ नये असे ही या निवेदनाद्वारे शासनाला विनंती करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

५ जुन २०२० रोजी केंद्र शासनाने शेतमाल व्यापार अधीक खुला करण्यासाठी तीन अध्यादेश पारित केले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपवुन कुठेही शेतमाल खरेदी विक्रीची मुभा दिली आहे. एक देश एक बाजार या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन व्यापाराला चालना दिली आहे. धान्य, कडधान्य, तेलबिया व कांदा बटाटा आवश्यक वस्तू कायद्यातुन वगळले आहेत व करार शेतीला प्रोत्सान देण्यात येणार आहे. अनेक दशकां पासुन शेतकर्‍यांच्या पायातील या बेड्या तोडण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी संघटना , हे सरकार योग्य दिशेने पडलेले पाऊल आहे असे मानते.

मार्केट सेस रद्द झाल्यामुळे थेट शेतकर्‍यांच्या घरातुन व शेतातुन खरेदी होईल. शेतकरी स्वत: आपल्या मालाचा भाव सांगेल व व्यापारी त्याच्या खर्चाने माल घेऊन जाइल. शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचा यात फायदा आहे. आवश्यक वस्तू कायद्यातुन शेतमाल वगळल्यामुळे भाववाढ झाल्यास विविध निर्बंध लादुन भाव पाडण्याची सरकारची क्षमता संपणार आहे. यामुळे निर्यात व शेतमाल प्रक्रिया उद्योगात वृद्धी होइल.

करार शेतीला शास्वत स्वरुप मिळणार असुन शेतकर्‍यांना आपल्या मालाला निश्चित दराने खरेदीदार मिळतील व ग्रामिण भागात प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यामुळे प्रचंड प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते हे ठळक फायदे शेतकरी, व्यापरी व ग्राहकांचे आहेत म्हणुन शेतकरी संघटना या अध्यदेशांना पाठिंबा देत आहे. गेली चाळीस वर्ष शेतकरी संघटना शेती व्यवसायाच्या खुलीकरणाची मागणी करत आहे.

आवश्यक वस्तू कायद्याबाबतचा अध्यादेश परिपुर्ण नसुन त्यात भाव वाढीची मर्यादा व साठवणुकीची मर्यादा ठेउन काही अनिश्चितता ठेवलेली आहे. या आध्यदेशातील त्रुटी केंद्र शासनाने दुर कराव्यात अशी अपेक्षा शेतकरी संघटना व्यक्त करते.

काही स्वातंत्र्य विरोधी पक्ष व संघटना या अध्यदेशांना विरोध करण्यसाठी आंदोलने करत आहेत. अशा प्रगती विरोधी शक्तींच्या दबावाला बळी पडुन, शासनाने उचलेलेले हे शेतकरी व देश हिताचे पाऊल मागे घेऊ नये अशी विनंती शेतकरी संघटनेने या निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक २४ ऑगस्ट रोजी राज्यभरातील तहसिल कार्यालयां मध्ये शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते हे निवेदन तहसिलदारांना सादर करतील अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com