माजी आ.प्रा.शरद पाटील पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर

प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत मुंबईत होणार प्रवेश
माजी आ.प्रा.शरद पाटील पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे ग्रामीण मतदार संघातील माजी आमदार तथा सामाजिक क्षेत्रातील अग्रणी सक्रीय कार्यकर्ते प्रा.शरद पाटील हे काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत.

येत्या 3 जून रोजी त्यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश होणार असल्याचे खात्रीशीर समजते.

ऐन तारुण्यात असतांनाच सामाजिक क्षेत्राची प्रचंड आवड असल्यामुळे सार्वजनिक जीवनात सक्रीय झालेले प्रा.शरद पाटील हे पद्मश्री क्रांती शाह यांच्या युवक बिरादरीकडे खेचले गेले. याचदरम्यान त्यांनी रक्तदान चळवळ सुरु केली.

सरत्या वर्षाला निरोप अन् नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मध्यरात्री 12 वाजता आपल्या सहकार्‍यांसह रक्तदान करण्याचा पायंडा आजही अखंडीत सुरु आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात प्रा.पाटील यांनी केलेल्या कामगिरीमुळेच ते खरे लोकप्रिय ठरले. तत्कालीन काँग्रेस पदाधिकार्‍यांशी झालेल्या मतभेदामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. दहा वर्ष झपाटल्यासारखे काम केल्याने सन 2009 मध्ये धुळे ग्रामीण मतदार संघातील जनतेने त्यांना आमदारकी बहाल केली.

मात्र विधानसभेच्या गत निवडणुकीत त्यांचे सेनेच्या वरिष्ठांशीही खटके उडाले. अर्थात वादाची ठिणगी कधीच पडली होती. परिणाम शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्यापर्यंत झाला. तेव्हापासून राजकीय दृष्टया प्रा.पाटील हे अस्वस्थ होते.

मात्र त्यांनी सामाजिक काम थांबविले नाही. मध्यंतरी ते राष्ट्रवादी पक्षात जाण्याची जोरदार चर्चा होती. त्यांच्याकडूनही या चर्चेला दुजोरा मिळाला होता. परंतु कुठे माशी शिंकली ठावूक नाही.

आता मात्र त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला असून आपल्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेसपासून सुरुवात करुन ते एका अर्थाने पुन्हा स्वगृही परतत आहेत. त्यांच्या या काँग्रेस प्रवेशाला देखील त्यांनी दुजोरा दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com