केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अधिकार - अजित पवार

केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अधिकार - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे / Pune - “जसं राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, तसाच देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा अधिकार आहे. मोदींनी कुणाला घ्यावं, कुणाला थांबवावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यात आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करण्याचं कारण नाही.” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांनी आज पुण्यातील विधानभवनात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघूनच हे सर्व लोकं निवडून आलेत. भाजपचे जे खासदार निवडून आलेत ते मोदी पंतप्रधान होणार म्हणून देशातील जनतेने त्यांना निवडून दिले,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

“भारती पवार पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्याच आहेत. त्या आदिवासी असून डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना घेतलेलं दिसतंय. कपिल पाटील आग्री समाजाचे आहेत. तेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच आहेत. आम्हीच त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलेलं. त्यांना संधी मिळाली. नारायण राणे कोकणातील नेते आहेत. त्यांनी मध्यंतरी त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. ते पूर्वी काँग्रेसचे नेते होते, शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. त्यांनाही संधी देण्यात आली. त्यानंतर डॉ. भागवत कराड त्यांना संधी दिली. तेही ओबीसीच आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

आमच्या सदस्यांकडून कोणतही गैरवर्तन नाही

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात झालेल्या गोंधळाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बोलताना आमच्या सदस्यांकडून कोणतही गैरवर्तन झालं नसल्याचं आतापर्यंतच्या अनुभावाच्या आधारे सांगतो, असं म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी विचारलं असता फडणवीस बोलतात त्यात तथ्य नाही, असं म्हटलं आहे. मी, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील 30 वर्षांपेक्षा अधिक काळ आमदार आहोत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 37 वर्ष आमदार आहेत. भास्करराव जाधव यांनी त्या दिवशी घडलेला प्रकार रेकॉर्डवर आणलं आहे. नियमांनुसार 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

निष्काळजीपणा करु नका मास्क वापरा

पुण्यात 607 रुग्ण म्युकरमायकोसिस आहेत. ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत ते लोक मास्क घालत नाहीत. परदेशात ज्या ठिकाणी दोन डोस घेतल्यानंतर मास्क न वापरण्याची मुभा देण्यात आली होती. तिथं पुन्हा मास्क लावायला सांगायला लागला. अनेकांनी दोन डोस घेतले म्हणून मास्क वापरणं बंद केलं. त्यांना कोरोना झाला आणि दुर्दैवानं त्यांचं निधन झालं असल्याची माहिती असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळे पुणे आणि महाराष्ट्रातील नागरिकांना माझी विनंती आहे की निष्काळजीपणा करू नका मास्क वापरा, असं ते म्हणाले. पुण्याचा मृत्यूदर 1.6 टक्के आहे, मात्र, पुण्यात ससून रुग्णालयात अनेक ठिकाणचे रुग्ण उपचारासाठी येतात त्यामुळं दर जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोरोना निर्बंधानुसार 4 नंतर सगळं सरसकट बंद झाले पाहिजे, असे आदेश पोलिसांना दिले असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. पुण्याचा ऑक्सिजन पुरवठा वाढवला आहे. हेच निर्बंध कायम असणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. पर्यटन स्थळी गर्दी होते आणि पॉझिटिव्हिटी वाढते तिकडे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यास सांगितल्याचं त्यांनी सांगितलं.

पेट्रोल दरवाढीबद्दल विचारलं असता पेट्रोल आणि डिझेल वरचे राज्याचे टॅक्स फडणवीस सरकारने जे आकारले होते तेच टॅक्स लावले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. फोन टॅपिंग प्रकरणाच्या पोलीस महासंचालकांच्या मार्फत होणाऱ्या चौकशी बद्दल विचारलं असता नाना पटोले यांनी जे आरोप केले फोन टॅपिंग बद्दलचे त्याची माहिती घेतली तर त्यात तथ्य असल्याचं समोर आलंय, असं अजित पवार म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com