
मुंबई | Mumbai
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात अलिकडे भेट झाली, या भेटीने राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले...
या प्रश्नाचे कोडे उलगडण्यासाठी स्वत: ॲड.प्रकाश आंबेडकर यांनीच पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या संदर्भातील सत्ता संघर्षाची सुनावणी न्यायालयाने पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेत सध्या शिंदे गट आणि भाजप असणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची रात्री भेट झाल्याने राज्यात राजकीय चर्चाना उधाण आले आहे. अनेकजण या भेटी मागचं कारण काय? याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असून मिडियाने या भेटीमुळे ठाकरे गट अडचणीत येणार असल्याचे म्हटले आहे.
याविषयी ॲड. प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, ”काल मी दिल्लीत होतो, त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातून मला फोन आला की मुख्यमंत्र्यांना तुम्हाला भेटायचं आहे. मी दिल्लीहून मुंबईला येणारच होतो, त्यामुळे मी मुंबईत आल्यावर भेटू असं सांगितलं आणि त्याप्रमाणे आमची भेट झाली.
भेटीदरम्यान प्रामुख्याने जी चर्चा झाली ती नोएडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती जी निर्माण केली जात आहे, त्या संदर्भाने झाली, त्यामध्ये कोणती कमतरता वगैरे नाही ना हे पाहिलं गेलं. ते योग्य आहे की नाही या संदर्भातील माझा निर्णय कळवायचा होता आणि याशिवाय तिथे एक इंटरॅक्शनसाठी इंटरनॅशनल सेंटर असावं, त्याच्या संदर्भातील असणारी सात जणांची नावं मी त्यांना दिली होती.
त्यांची त्यासंदर्भाने बैठक सुद्धा झाली होती. भेटी मागील अधिकृत चर्चा जर काही होती तर हीच होती,” असं ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
भाजप सोबत जाणार का? यासोबतच भेटी दरम्यान इतर अनेक विषयांवर चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मुद्यावर बोलताना त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडून या विषयावर पडदा टाकला.
ॲड. प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले,” शत्रूचा शत्रू आपला मित्र असं मानलं जात असलं तरी भाजप सोबत असणारे मित्रपक्ष आणि भाजप यांच्यासोबत आम्ही जाणे शक्यच नाही. शिवसेनेसोबतच आम्ही पुढील निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो कायम आहे, असे ते म्हणाले.