राष्ट्रपती निवडणुक : शरद पवारांना बळीचा बकरा करू नका - रामदास आठवले

राष्ट्रपती निवडणुक : शरद पवारांना बळीचा बकरा करू नका - रामदास आठवले

पुणे (प्रतिनिधि) / Pune - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे धोकेबाज नेते नसून ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार जर राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील‌ तर आमच्या शुभेच्छा असतील. पण, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नका, असे वक्तव्य पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे सत्तास्थानी आलेल्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये ताळमेळ नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे. विधानसभा अध्यक्षांची निवडणुक आमदार फुटतील या भीतीने पुढे ढकलण्यात येत आहेत. संसदेने मराठा आरक्षणाचे अधिकार राज्याला देण्यासाठी ठराव पारीत‌ करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच ईडीच्या कारवाईशी केंद्र सरकारचा काडीमात्र संबंध नसल्याचे आठवले म्हणाले.

ओबीसी समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्यामुळे जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. “जातीनिहाय जनगणना करण्याबाबत मी सकारात्मक असून, त्यातून अनेक जातींना आरक्षण नेमके कसे द्यावे, हे निश्चित करणे सोयीचे होईल व सर्वाना न्याय देता येईल. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्याला अधिकार द्यावेत, कायद्यात बदल करावेत. ओबीसींच्या २५ टक्केमध्ये वर्गावारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, कोणत्या जाती कोणत्या गटात टाकावेत याचा विचार करावा. आर्थिक दुर्बलांना १० टक्के शिक्षण आणि नोकरीचे आरक्षण मिळेल,” असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल, असे ते म्हणाले.

“रिपब्लिकन पक्षाचे आता पालिकेत पाच नगरसेवक आहेत. तीन उपमहापौर झाले आहेत. स्वबळावर निवडणूक लढून हे यश मिळवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही भविष्यातही भाजपसोबतच राहणार असून, नगरसेवकांची संख्या वाढवणार आहोत. विधानसभेलाही आम्हाला भाजपच्या साथीने चांगल्या जागा मिळतील,” असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com