आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचण्याचा प्रयत्न केला तर…; भाजपचा इशारा

मुंबई | Mumbai

राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. भाजपाच्या (BJP) पोलखोल यात्रेवर शिवसैनिकांनी तोडफोड केली. काल रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नवनीत राणांच्या बाबतीत बोलायचे झाले तर केवळ हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण हा एकच विषय होता….

शिवसैनिकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊ देण्यात आले. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आणि कार्यकर्ते पोलिसांच्या डोळ्यादेखत गुंडगिरी करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात सरकारपुरस्कृत दहशत, गुंडगिरी झाली नाही. याचे समर्थन शिवसेना (Shivsena) नेते करत आहेत. सरकार आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. जर तुम्ही आक्रमक होणार असाल तर आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही, असा इशारा प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला आहे.

मातोश्री (Matoshri) येथून जात असताना शिवसैनिकांनी हल्ला करत कंबोज यांच्यावर मातोश्रीच्या परिसराची रेकी केल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. आज भाजपच्या (BJP) आमदारांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यावेळी प्रवीण दरेकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भाजपा नेत्यांनी टोकाचा संघर्ष केला आहे. भाजपाचा संघर्षाचा इतिहास आहे. जर आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजपा शांत बसणार नाही. मात्र आम्ही कायद्याला आणी लोकशाहीला मानणारे आहोत. त्यामुळे कायद्याच्या मार्गाने जे करता येईल ते आम्ही करू. आम्ही पोलिसात जाऊन आय़ुक्तांना निवेदन देऊ. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू.

या हल्ल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. आज सरकारच्या माध्यमातून होत असलेला दहशत पसरवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री मूग गिळून गप्प आहेत. मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला मोकळीक दिली आहे. राज्याच्या संस्कृतीला काळिमा लावण्याची कृती केलेली आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.