दिल्ली | Delhi

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचे त्यांच्या पश्चात प्रकाशन होत आहे. या पुस्तकात प्रणबदांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. २०१४ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जबाबदार धरलं आहे. तसंच २००४ मध्ये प्रणव मुखर्जी यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा सोपवली असती तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पाहावा लागला नसता असं काही नेत्यांचं मत होतं, असा दावा प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक ‘द प्रेसिडेन्शिअल ईयर्स’मध्ये केला आहे.

पुस्तकात मुखर्जी यांनी लिहिले आहे की, काही नेत्यांच्या मते २००४ मध्ये मनमोहन यांच्या ऐवजी मला (प्रणव मुखर्जी) पंतप्रधान होण्याची संधी मिळाली असती तर परिस्थिती वेगळी असती. अर्थात त्यांच्या मताशी मी सहमत नाही. पण एक नक्की की मी राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेस पक्ष राजकीय दिशा गमावून बसला. दिशाहीन झालेल्या काँग्रेसला पुन्हा मार्गावर आणणे सोनिया गांधींना जमले नाही. मनमोहन सिंह यांचा तर संसदेतील खासदारांशी असलेला संपर्कच तुटत चालला होता. संसदेतील प्रदीर्घ गैरहजेरीमुळे त्यांचा खासदारांशी वैयक्तिक पातळीवर ऋणानूबंध निर्माण झाला नाही. याचा राजकीयदृष्ट्या पक्षाला तोटा झाला.

सरकार चालवण्याचा नैतिक अधिकार पंतप्रधान या पदावरील व्यक्तीसोबत असतो. संपूर्ण देशाचा कारभार हे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांच्या धोरणांचे प्रतिबिंब असते. पण पंतप्रधान मनमोहन सिंह कायम यूपीएतील गटातटांचे राजकारण सांभाळण्यात अडकले. याचा परिणाम त्यांच्या कामावर झाला. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून सर्व गोष्टींवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यावर भर दिला. यामुळे अनेकदा सरकार, संसद आणि न्यायव्यवस्था याच्यात संघर्ष झाला. पण मोदींच्या राजकीय सामर्थ्यामुळे ते या संघर्षातून तरले.

मुखर्जी यांनी या पुस्तकात मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाची तुलनाही केली आहे. दोन्ही आजी-माजी पंतप्रधानांच्या काळात मुखर्जी राष्ट्रपती होते. त्यामुळे त्यांनी या दोन्ही नेत्यांच्या कार्यकाळाची तुलना केली आहे. मनमोहन सिंगांचा त्यांचा सर्वाधिक वेळ यूपीए आघाडी टिकवण्यात गेला. त्यामुळे त्याचा कारभारा मोठा परिणाम झाला. तर मोदींनी एकतंत्राचा अवलंब करत सत्ता चालवली. त्यामुळे सरकार, प्रशासन, कायदे मंडळ आणि न्यायपालिकेसोबतच्या त्यांच्या संबंधात कटुता निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं, असं सांगतानाच मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात या संबंधात काही बदल होतो का हे पाहावं लागेल, असंही नमूद करण्यात आलं आहे.

मुखर्जी यांनी पुस्तकात पश्चिम बंगालमधील त्यांच्या बालपणाविषयी पण लिहिले आहे. पुस्तकाची रुपरेखा त्यांच्या बालपणापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतच्या प्रवासाची गोष्ट अशी आहे. प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीचे निमित्त साधून शुक्रवारी, ११ डिसेंबर रोजी रुपा प्रकाशनने पहिल्यांदाच पुस्तकाची माहिती जाहीर केली. जानेवारी २०२१ पासून पुस्तक जगभरच्या प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल, अशी माहिती रुपा प्रकाशनने दिली.

दरम्यान मुखर्जी यांचे करोना तसेच शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे ३१ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. त्यावेळी ते ८४ वर्षांचे होते. पुस्तकातील त्यांचे काँग्रेसविषयीचे मत नेमके अशावेळी प्रकाशात आले आहे जेव्हा काँग्रेसमध्ये नव्याने अंतर्गत कलह सुरू आहेत.