अभिभाषणातील मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांचा राष्ट्रपतींना सवाल, म्हणाले..

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई l Mumbai

प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत तिरंग्याचा अपमान होणे हे दु:खद असल्याचे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपतींनी संसद अधिवेशनाच्या सुरवातीला आपल्या अभिभाषणात यावर वक्तव्य केले आहे. पण यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपतींना सवाल केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे की, ‘आदरणीय राष्ट्रपती महोदय, प्रचंड दुःख आणि खेदाने आपल्याला याची आठवण करून देणं आवश्यक आहे की, ज्या RSSने आपल्याला राष्ट्रपती बनवलं आहे, त्यांना १९४९ मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावं लागलं होतं की, ते तिरंग्याचा अपमान करणार नाही आणि २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवू’.

तसेच, ‘RSSने तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर RSS ने १५ ऑगस्ट १९४७ साली काळा दिवस साजरा केला होता. त्यांची निंदा, निषेध का करत नाही करत?’ असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

अभिभाषणात काय म्हणाले होते राष्ट्रपती ?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी राष्ट्रपती बोलतांना म्हणाले, कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाच आदर करते पण प्रजासत्ताक दिनी झालेल्या लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा निषेध करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारताच्या तिरंग्याचा अशाप्रकारे अपमान होणं ही दुर्भाग्याची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी . कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत आहे असे म्हटलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *