Friday, April 26, 2024
Homeराजकीयपोलीस दबावाखाली वागताहेत !

पोलीस दबावाखाली वागताहेत !

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

सरकार बदलून वर्ष उलटले तरी पोलिसांची मानसिकता मात्र बदलेली नाही. खाल्ल्या मिठाला जागल्यासारखे ते दबावाखाली वागत आहेत. पण याद राखा,

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्यांविरुध्द खोटे गुन्हे दाखल कराल तर गाठ माझ्याशी आहे. असा सज्जड इशारा वजा दम राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी दिला आहे.

अलिकडे घडलेल्या काही घटनांचा संदर्भ देत श्री.गोटे यांनी पत्रक प्रसिध्दीस देवून पोलीस प्रशासनाला चांगलेच खडसावले आहे.

त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, स्थानिकांना काम मिळावे यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वंडर सिमेंट कंपनीत आंदोलन केले.

मात्र एका पुढार्‍यांने पोलिसांवर दबाव आणून अराजकता माजेल वैगेरे शब्द वापरुन गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. आपण स्वतः पोलीस ठाण्यात जावून कंपनी अन्याय करीत असल्याचे उदाहरणासह संबंधित अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले.

वास्तविक चूक की बरोबर हे ठरविण्याचा अधिकार पोलिसांना नाही तर तो न्यायालयास आहे, असे श्री.गोटे यांनी म्हटले आहे.

तीन दिवसांपुर्वी कलमाडी येथील शेतकर्‍यांनी आपला कापूस तीन व्यापार्‍यांना विकला. मात्र त्यांनी मापात पाप करुन फसगत केल्याचे लक्षात आल्याने गावासमोर त्यांची चूक उघड करून त्यांनी ती मान्यही केली.

व्यापार्‍यांनी प्रत्येकी दीड लाख देण्याची तयारी दर्शविली. हे प्रकरण तिथेच मिटल्याने याबाबतची माहिती असूनही पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही.

परंतु जि.प.तील भाजपाचे कृषी सभापती रामकृष्ण उर्फ बापू खलाणे यांनी शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांची बाजू घेवून उलट कलमाडीच्या शेतकर्‍याला भ्रमणध्वनीवर खंडणी व किडनॅपींगची खोटी केस दाखल करण्याचा दम भरला.

जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे याप्रकरणात संबंधित व्यापार्‍याला दवाखान्यात दाखल करून खोटे सर्टीफिकेट घेवून धुळ्यात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.

नरडाणा पोलिसांच्या हद्दीत हे प्रकरण घडले असतांना धुळ्यातील पोलिसानी दबावात येवून गुन्हा दाखल करुन घेत तो नंतर वर्ग केला.

मात्र आतापर्यंत तुमची मनमानी, दादागीरी चालली. यापुढे लाचार भ्रष्ट अधिकार्‍यांना हाताशी घेवून राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यास गाठ माझ्याशी आहे असे श्री.गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

82 वर्षांचे माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख तसेच अ‍ॅड.एकनाथ भावसार यांच्यावर दाखल केलेल्या खोटे गुन्ह्यांचाही आपण बदला घेणार असून धुळे-नंदुरबार जिल्ह्याचे पालक या नात्याने कार्यकर्त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचेही श्री.गोटे यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या