'निवडणुका संपल्या की दरवाढ ठरलेलीच!, हे काय वित्त नियोजन आहे का?'

इंधन दरवाढीवरून जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका
'निवडणुका संपल्या की दरवाढ ठरलेलीच!, हे काय वित्त नियोजन आहे का?'

मुंबई | Mumbai

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. तेल कंपन्यानी आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचं दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी २५ पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

'निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ केली जाते. हे काय वित्त नियोजन आहे का?', असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच, 'केंद्रीय अर्थमंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा, असे मत जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले.

दरम्यान, दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९२.०५ रुपये आणि डिझेलची किंमत ८२.६१ रुपये प्रति लीटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल १००.७५ पैसे तसेच डिझेलही ९०.६८ रुपये दराने विक्री केली जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ८९.७५ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com