केरळमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा झटका

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला एक मोठा झटका बसला आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराचे विश्वासू राहिलेले पीसी चाको यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. चाको यांनी बुधवारी राजीनाम्याची घोषणा केली. चाको यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांना राजीनामा पाठवल्याची माहिती चाको यांनी स्वतः दिली आहे. ‘मी मागील अनेक दिवसांपासून माझ्या मनात हा विचार सुरू होता. केरळमध्ये काँग्रेस नाहीये. एक काँग्रेस (आय) आणि काँग्रेस (ए) आहे. या दोन्ही पक्षांची एक समन्वय समिती आहे. गटबाजी हा केरळ काँग्रेसला लागलेला मोठा शाप आहे,’ अशी टीका चाको यांनी केली आहे.

तसेच,’ केरळ काँग्रेसमध्ये वर्चस्व गाजवणारे दोन गट आहेत. एका गटाचं प्रतिनिधीत्व माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी हे करतात, तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला हे करतात, असंही चाको यांनी म्हटलं आहे. लोकांना काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणायचं आहे, पण गटबाजी या मार्गात मोठा अडथळ बनला आहे. केरळ काँग्रेसमध्ये असलेली गटबाजीकडे आपण दिल्लीतील नेतृत्त्वाचं लक्ष वेधलं होतं. पण पक्षश्रेष्ठीने दोन्ही गटांनी दिलेला प्रस्तावाला मंजूरी दिली. गटबाजी थांबवण्यासाठी पक्षाने काहीही केलं नाही. काँग्रेस ९० जागा लढवणार असून, त्या दोन्ही गटांमध्ये विभागलेल्या आहेत. केरळ काँग्रेसमध्ये कोणतीही लोकशाही राहिली नसून, उमेदवारांच्या यादीबद्दल प्रदेश समितीसोबत चर्चाही करण्यात आली नाही. काँग्रेससाठी काम करणं अवघड आहे.’ असंही चाको यांनी म्हटलं आहे.

पीसी चाको यांनी आपली पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट केली नसली, तरी त्यांच्या पक्षत्यागाने काँग्रेसला विशिष्ट पट्ट्यामध्ये राजकीय तोटा सहन करावा लागणार आहे, हे नक्की असल्याचे राजकीय निरीक्षक मानत आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या मतदारसंघातील ४ नेत्यांनीही गेल्या आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यात केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सदस्य केके विश्वनाथन, केपीसीसी सचिव एमएस विश्वनाथन, डीसीसी महासचिव पीके अनिल कुमार आणि महिला कांग्रेस नेत्या सुजाया वेणुगोपाल यांचा समावेश होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *