Friday, April 26, 2024
Homeराजकीयवाडेगव्हाण, मावळेवाडीचे सरपंच, उपसरपंचांसह सदस्य राष्ट्रवादीच्या वाटेवर

वाडेगव्हाण, मावळेवाडीचे सरपंच, उपसरपंचांसह सदस्य राष्ट्रवादीच्या वाटेवर

सुपा |वार्ताहर|Supa

वाडेगव्हाणचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच उद्धव शेळके, मावळेवाडीचे सरपंच उदय कुरकुटे, उपसरपंच गणेश पठारे यांच्यासह

- Advertisement -

दोन्ही ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी आ. निलेश लंके यांची भेट घेऊन राष्ट्रवादीसोबत काम करण्याची इच्छा प्रकट केल्याने दोन्ही ठिकाणी शिवसेनेला खिंडार पडले आहे. होम ग्राउंडमध्येच पक्षाला खिंडार पडल्याने पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्यासाठी तो धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्व प्रमुख मंडळी शिवसेनेसोबत असतानाही राष्ट्रवादीचे निलेश लंके यांना वाडेगव्हाणमध्ये 454 मतांची आघाडी मिळाली होती. मावळेवाडीमध्येही आ. लंके 99 मतांनी पुढे होते. तेव्हापासूनच दोन्ही गावांमधील विशेषतः तरुण कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती. अनेकदा या पदाधिकार्‍यांनी आ. लंके यांच्याशी संपर्कही केला होता.

याच आठवड्यात प्रमुख पदाधिकार्‍यांनी मुंबईत आ. लंके यांची भेट घेऊन आता चोरून लपून नको तर जाहीरपणे तुमच्यासोबत काम करू द्या, तुमच्या माध्यमातून गावात विकास कामे करू द्या, अशी गळ घातली. मुुुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. लवकरच प्रवेशाचा सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

आ. लंके यांची भेट घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये किशोर यादव यांचाही समावेश असून मुुंबई भेटीनंतर या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यानी आ. लंके यांच्या जाहीर कार्यक्रमांनाही हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. काळकूप येथे झालेल्या कार्यक्रमात वाडेगव्हाणचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच उद्धव शेळके, किशोर यादव हे उपस्थित होते.

त्यांचा यावेळी आ. लंके यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यासंदर्भात किशोर यादव यांच्याशी संपर्क साधला असता आमचा निर्णय अंतिम झाला असून लवकरच वाडेगव्हाण येथे मोठा कार्यक्रम घेण्यात येऊन पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळयाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेनेला मोठा दणका

तालुक्यातील तब्बल 88 ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोन गावचे पदाधिकारी व सदस्य पक्षांतर करणार असल्याने शिवसेनेला मोठा दणका बसणार आहे. दोन्ही गावांच्या यावेळी निवडणुका नसल्या तरी तालुक्यात जाणार्‍या पक्षांतराच्या संदेशाचा फटका शिवसेनेला बसणार आहे. शिवाय आणखीही काही गावांचे पदाधिकारी, सदस्य आ. लंके यांच्या संपर्कात आहेत. सेनेचा एक बडा पदाधिकारीही राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे.

पारनेर नगरपंचायत पाठोपाठ आता वाडेगव्हाण

राज्याच्या मंत्रिमंडळात मित्र पक्ष असलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा झाली होती. राज्य पातळीवरील प्रसार माध्यमांमध्ये आठ दिवस नगरपंचायतीतील पक्षांतरावरच खल सुरू होता. अखेर या पाचही नगरसेवकांनी पुन्हा शिवसनेनेत प्रवेश केल्यानंतर ही चर्चा थांबली. विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून त्यास खतपाणी घातले जात असल्याची त्यावेळी चर्चा होती. आता पुन्हा आमदार निलेश लंके यांच्याच मतदारसंघातील शिवसेनेचे सभापती गणेश शेळके यांच्या गावातील व गावाशेजारील सरपंच व उपसरपंच राष्ट्रवादीत प्रवेश करते झाल्यामुळे पुन्हा एकदा पक्षांतराच्या विषयावर चर्चा झडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सभापती शेळके यांचे पॅचअपचे प्रयत्न

सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची कुणकुण लागल्यानंतर सभापती गणेश शेळके यांनी पॅचअप करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नसल्याची माहीती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या