पारनेरच्या ‘त्या’ नगरसेवकांचे 27 जुलैला मनोमीलन
राजकीय

पारनेरच्या ‘त्या’ नगरसेवकांचे 27 जुलैला मनोमीलन

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

महाआघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरा यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस असल्याने शिवसैनिकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. त्या कार्यक्रमात येऊन शिवसेना-राष्ट्रवादी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाबाबत अधिक भाष्य करेल, अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिली. बुधवारी सकाळी माजी आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयात कोरेगावकरांनी स्वतंत्र चर्चा करत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना बरोबर घेत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या बरोबर शासकीय विश्रामगृहात चर्चा केली.

महाआघाडीचा धर्म पारनेर तालुक्यात पाळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनोमीलन करणार असल्याचे कोरेगावकर यांनी सांगितले आहे. ते पारनेरमध्ये बुधवारी सकाळी आले होते. माजी आमदार विजय औटी यांच्या बरोबर त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. चर्चा काय झाली याबाबत मजकूर काही समजू शकला नाही.

यावेळी जि. प. सभापती काशीनाथ दाते, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले जि. प. सदस्य संदेश कार्ले, सभापती गणेश शेळके, माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, तालुकाप्रमुख बंडू रोहकले, युवासेनेचे तालुकाध्यक्ष नितीन शेळके, सचिन गोडसे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. तर दुसरीकडे बुधवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस आ. निलेश लंके यांच्याबरोबर विश्रामगृहात अशोक सावंत, शिवसेनेच्या नगरसेवक किसन गंधाडे, डॉ. मुदस्सर सय्यद, नगरसेवक नंदकुमार देशमुख, नगरसेविका वैशाली औटी, नंदा देशमाने यांच्याशी चर्चा करण्यात आली.

गेल्या आठवड्यात संपर्कप्रमुख कोरगावकरांचा दौरा रद्द झाला होता. त्यामुळे काय चर्चा होते. याकडे तालुक्यातील शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र राष्ट्रवादी व शिवसेना गटाच्या मनोमिलन करण्यासाठी कोरगावकर हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवारी पारनेर दौर्‍यावर आले होते.

पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी दहा दिवसांपूर्वी आ. निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे प्रवेश केला होता. या कारणावरून महाआघाडीच्या नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेत या पाच नगरसेवकांसह महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांच्या हातात मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवबंधन बांधले होते.

त्यामुळे या शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्थानिक नेतृत्व माजी आ. विजय औटी यांच्या 5 पानी तक्रारीचा पाढा थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांच्या समोर मांडला होता. पारनेरचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले असून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरें यांनी दिले.

Deshdoot
www.deshdoot.com