पारनेरचे नगरसेवक स्वगृही, नेता मात्र बदलला

औटी यांना ‘साईड ट्रॅक’ केल्याची तालुक्यात चर्चा : आ.लंके समन्वय करणार
पारनेरचे नगरसेवक स्वगृही, नेता मात्र बदलला
पारनेरचे नगरसेवक स्वगृही

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

तुमच्या स्थानिक अडचणी लक्षात आल्या. पारनेरच्या पाणीपुरवठा योजनेला तात्काळ मंजुरी देऊ. तुम्हाला काही अडचणी आल्यास शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर व आ. निलेश लंके त्या सोडवतील. आघाडीत बिघाडी झाल्याचा वेगळा संदेश राज्यात जाऊ नये म्हणून तुम्ही शिवसेनेतच थांबावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यामुळे दोन दिवसांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले पारनेरचे नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले.

पक्ष तोच पण नेता बदलला, असा हा प्रकार असून, शिवसेनेचे नगरसेवक असतानाही त्यांच्याशी राष्ट्रवादीचे आ. लंके समन्वय ठेवणार असल्याचे सांगितल्याने विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते विजय औटी यांना ‘साईड ट्रॅक’ केले का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे चार आणि एक सहयोगी अशा पाच नगरसेवकांनी शिवबंधन दूर करून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले होते. या राजकीय घडामोडींमुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही खळबळ उडाली होती. राज्यात एकत्र सत्ता उपभोगणार्‍या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील हा पक्ष संघर्ष राजकीय क्षेत्रात चर्चेचा झाला होता. शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये यामुळे बैठका रंगल्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ‘मातोश्री’वरील चकरा वाढल्या. पक्षाचे प्रतोद संजय राऊत यांनी ‘वादावर पडदा पडला’ असे जाहीर करून काही तास उलटत नाही, तोच गेलेले नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले.

बुधवारी दुपारी ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाच नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीत पाचही नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत यावे, असे ठरले. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी नुकताच बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आ. लंके यांच्या पुढाकाराने प्रवेश केला होता.

त्यापूर्वी दोन दिवसांच्या घमासाननंतर पारनेर नगरपंचायतीचे पक्षांतर केलेल्या नगरसेवकांसह आमदार लंके यांनी बुधवारी सकाळीच मुंबई गाठली. मंत्रालयात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. काही वेळाने तेथे शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आले. चर्चेनंतर नगरसेवकांना नार्वेकर यांच्या हवाली करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेर तालुका महिला आघाडी प्रमुख उमाताई बोरुडे, नगरसेवक नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, डॉ. मुद्दसर सय्यद, विजय वाघमारे, विजय औटी, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, जितेश सरडे आदी उपस्थित होते. पारनेर शहराचा पाणीप्रश्न तात्काळ सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याने तसेच आघाडी सरकारवर परिणाम होऊ नये व राज्यातील आघाडी सरकार विषयी वेगळा संदेश जाऊ नये म्हणून आम्ही पुन्हा शिवसेनेतच थांबण्याचे ठरवले. आमचे प्रश्न आता भाऊ कोरगावकर व आ. निलेश लंके सोडविणार आहेत. मिलिंद नार्वेकर, आ. लंके यापुढील काळात नाराज नगरसेवकांशी समन्वय ठेवणार असून पुन्हा त्यांच्यात नाराजी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही बैठकीत ठरल्याचे नगरसेवक नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com