Thursday, April 25, 2024
Homeराजकीयशरद पवार यांचे कौतुक करणारे ट्विट पंकजा मुंडेंनी केले डिलीट

शरद पवार यांचे कौतुक करणारे ट्विट पंकजा मुंडेंनी केले डिलीट

मुंबई | Mumbai

काल (मंगळवारी) राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता. पंकजा मुंडे यांच्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिसाद दिला होता. मात्र पंकजा मुंडेंनी आता ते ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे विविध चर्चाना उधाण आले आहे.

- Advertisement -

काय म्हंटल होत पंकजा मुंडेंनी ?

“शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला होता.

रोहित पवारांनी पंकजा मुंडेंचे केले जाहीर कौतुक

पंकजा मुंडेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले आहेत की, “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा”.

उसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी 14 टक्के वाढ

उसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी 14 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. प्रतिटन 35 ते 40 रुपयांची वाढ मिळाली आहे. त्यानंतर कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे अशी माहिती साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे. पुण्यात उसतोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, सुरेश धस हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी राज्यातील ऊस तोडणी आणि ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

उसतोड कामगारांना 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 35 ते 40 रुपये उसतोड कामगांना जास्त मिळतील. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना 300 ते 359 कोटी रुपये त्यासाठी द्यावे लागणार आहे. अशी माहिती साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या