Saturday, April 27, 2024
Homeराजकीय'लसीकरणाचं झालं; आता इंधनांची शंभरीही साजरी करा'

‘लसीकरणाचं झालं; आता इंधनांची शंभरीही साजरी करा’

दिल्ली | Delhi

भारताने शंभर कोटींच्या लसीकरणाचा (Corona Vaccination) टप्पा पार केला आहे. केंद्रातील मोदी सरकारने शंभर कोटींचे लसीकरण पूर्ण झाल्याचा टप्पा साजरा केला. दुसरीकडे इंधनदरांमध्येही मोठी वाढ झालेली आहे.

- Advertisement -

या इंधन दरवाढीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवलाय. ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीकरणाची शंभरी साजरी केली त्याच पद्धतीनं त्यांनी इंधनांची शंभरीही साजरी करावी, असा टोला माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी लगावलाय.

चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, पंतप्रधान मोदींनी शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा गाठल्यानंतर मोठे सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्या मंत्र्यांचे नेतृत्व केले. मात्र, त्यांनी आणखी काही गोष्टींनी शंभरी गाठल्या आहेत, त्याचं देखील सेलिब्रेश करायला हवं. पेट्रोलने १०० रुपये प्रति लीटरचा टप्पा गेल्या काही आठवड्यांपूर्वी गाठला आहे तर आता डिझेलनेही १०० रुपये प्रति लीटरचा मजल मारली आहे. दुसरीकडे गॅस सिलींडरनी १००० रुपयांचा टप्पा गाठला असून या सेलिब्रेशनसाठी या देखील मोठ्या संधी उपलब्ध असल्याचा खोचक टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०७.७९ रुपये आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर आज ११३.४६ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर दिल्लीत डिझेल ९६.३२ रुपये आणि मुंबईमध्ये १०४.३८ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. देशातील प्रमुख महानगरांबाबत बोलायचं झालं तर, मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या