
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन चांगलेच पेटला असून आता उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या दौऱ्यांमध्ये मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीच्या नेत्यांनाही टार्गेट केलं आहे. यामध्ये छगन भुजबळांचाही (Chhagan Bhujbal) क्रमांक आहे. छगन भुजबळांना मराठ्यांनी मदत केली असं म्हणत त्यांनी आता मराठ्यांच्या बाजूने उभं राहावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. या सर्व टीकांवर छगन भुजबळांनी आज प्रतिक्रिया दिली.
मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नाहीच. मात्र आधीच ओबीसी समाजाला (OBC Reservation) आरक्षण खूप कमी आहे, त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या आणि हे मत माझं एकट्याचे नाही, इतर अनेक नेत्यांचे हेच मत आहे, त्यामुळे इतरांचे नाव घेऊन जरांगे का बोलत नाही? मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला नाहीतर, त्याला राजकीय वास येईल, असे प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिले आहे.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा आरक्षणा संदर्भातील कायदा केला, त्यावेळी आमचा सुद्धा पाठिंबा होता. दुसरीकडे ओबीसी घटकाला आरक्षण कमी असून लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे पावणेचारशे जाती आहेत. 17 टक्के आरक्षण शिल्लक राहिलेले आहे, त्यांना वेगळे आरक्षण द्या, त्यात काही अडचण झाली आहे, ती दूर करा, एवढंच माझं म्हणणं आहे. शिवाय हा माझे एकट्याचे मत नसून सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. विदर्भातील जो कुणबी समाज आहे जो ओबीसी मधून मोडतो यांनी देखील मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये म्हणून आंदोलन केले. आता मग त्यांच्याविरुद्ध बोला त्यांनी उपोषण केले, त्यांनी उठाव केला. मी गेल्या अनेक वर्षांपासून मागासवर्गीयांसाठी लढण्याचं काम करत आहे, मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा इतरांच्या बाबतीतही बोला नाहीतर त्याला राजकारणाचा वास आल्याशिवाय राहणार नाही.
राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरला आहे. सर्वांनीच आरक्षणाची मागणी लावून धरल्याने सरकारही कोंडीत सापडलं आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा जवळपास संपत आल्याने कोणाला किती आणि कशाचा आधारवर आरक्षण द्यायचं याबाबत सरकार पातळीवर चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांमध्ये राजकीय नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.