एस.टी. बँकेतील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात ५८ वरून ६० वर्ष करण्यास इंटकचा विरोध

एसटी बँकेच्या कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलन व न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे.
INTUC
INTUC

अहमदनगर - एस.टी. महामंडळातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीचे वय तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील शासकिय, निमशासकीय, विविध महामंडळातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष आहे. असे असताना संचालक मंडळाने दि. २१ जानेवारी, २०२० रोजी झालेल्या पगारवाढीच्या करारातील मागणी क्र. ३४ अन्वये एस.टी. को-ऑप. बँकेतील कर्मचा-यांच्या सेवा निवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत तत्वत: मान्यता दिलेली असून उद्या होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्याच्या अनुषंगाने राजकिय दबावतंत्र सुरू असल्याने एसटी बँकेच्या कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलन व न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे.

एस.टी. कर्मचा-यांचे व महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय, निमशासकीय, विविध महामंडळातील कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष असताना मान्यताप्राप्त संघटनेच्या संचालक मंडळाने कशाच्या आधारावर तत्वत: मान्यता दिली आहे? एस.टी. कर्मचा-यांच्या जीवावर चालणा-या बँकेच्या कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे म्हणजे एस.टी. कर्मचा-यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस.टी. कर्मचारी आर्थिक संकटात सापडला असताना एस.टी.बँकेच्या पैशाची उधळपट्टी करणे निषेधार्य आहे.यामुळे बँकेवर १० कोटी रूपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचा-यांची वेतनधारी बँक म्हणून स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप.बँक लि.मुंबई कार्यरत आहे. सदर बैंक एस.टी. कर्मचा-यांच्या सभासद वर्गणी, शेअर्स, भाग भांडवल, घेतलेल्या कर्जाचे व्याज यावर चालते. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप लि. बँकेचे मुख्यालय व ५० शाखांचे कामकाज तसेच सभासद वर्गणी व कर्ज वसुली एस.टी. महामंडळाच्या जागा व यंत्रणेमार्फत केले जाते. एस.टी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक हेच बँकेचे पदसिध्द अध्यक्ष असून एस.टी. महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी हे पदसिध्द उपाध्यक्ष आहेत. एस.टी. को.ऑप. बँकेची स्थापना मुळात एस.टी. कर्मच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करुन त्यांचे जीवनमान उंचाविण्याकरीता झालेली आहे. एस.टी. बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या नियंत्रणाखाली व सहकार कायदयाच्या अंतर्गत चालते.

एस.टी. को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक उद्या दि. २९ जून २०२० रोजी दुपारी ३ वा. आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत एस.टी. बँकेच्या कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्ष करण्याकरीता राजकिय दबावतंत्र सुरु आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाची मुदत दि.२७ मे २०२० रोजी संपलेली आहे. महाराष्ट्र शासन आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संसर्ग टाळण्यासाठी व निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क मधील तरतूदीनुसार तीन महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत संचालक मंडळाने कोणताही बेकायदेशीर निर्णय घेऊ नये असे पत्राव्दारे एसटी बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी तक्रार केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com