मोदी सरकारविरोधात विरोधक एकत्र; सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक

मोदी सरकारविरोधात विरोधक एकत्र; सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक

दिल्ली | Delhi

केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सायंकाळी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना पाचारण करण्यात आलं आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) उपस्थित राहणार आहेत. या शिवाय तामिळनाडू आणि झारखंड राज्यांसह काँग्रेस शासित इतर राज्यांचेही मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे ही बैठक कोणत्या मुद्द्यांवर आयोजित करण्यात आली आहे याबाबतचा तपशील बाहेर आला नाही.

आज (शुक्रवार) सायंकाळी ४.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. सोनिया गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हेदेखील या बैठकीला उपस्थित राहतील.

नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस हेरगिरी प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलं. संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरताना विरोधी पक्षांची एकजुटता स्पष्टपणे दिसून आली होती. आज होणाऱ्या बैठकीत विरोधकांच्या आगामी वाटलाचीविषयी आणि रणनीतीविषयी चर्चा होणार आहे.

देशाला भेडसावणाऱ्या प्रमुख प्रश्नांवर विरोधी पक्षांना सोबत घेऊन सोनिया गांधी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठीच त्यांनी विरोधकांची बैठक बोलावल्याचं बोललं जात आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी तसेच मोदी सरकारवर मात करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com