
वादग्रस्त वक्तव्यांमुळे स्वत:ला आणि सरकारला सातत्याने अडचणीत आणणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.
गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळे कोश्यारी अडचणीत आले होते. त्यामुळे विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर केल्यानंतर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जयंत पाटील काय म्हणालेत?
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीये. "महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो !", असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
कोश्यारी यांना बदललं म्हणजे उपकार नाही केले
कोश्यारी यांना बदललं म्हणजे उपकार नाही केले, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्याच्या जनतेने राज्याच्या राजकीय पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटनांनी एक भूमिका घेतली आणि राज्यपालांच्या विरोधामध्ये या राज्यामध्ये प्रथमच लोक रस्त्यावर उतरले. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम केलं. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारशी नाकारण्यात आल्या, असं संजय राऊत म्हणाले.
आधीचे राज्यपाल हे दबावाखाली काम करत होते. आता नवीन राज्यपाल हे राज्याला मिळाले आहेत त्यांचं नाव रमेश बैस आहे की बायस आहे माहित नाही, अशी मिश्कील मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच भाजप आणि केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पाठीशी घातल याची इतिहासात नोंद राहील. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं राजभवनाचे भाजप कार्यालय बनवू नये. सध्याचं सरकार घटनाबाह्य आहे याचं भान राज्यपालांनी ठेवावं. असही राऊत म्हणाले.
दिवसाची सुरुवात चांगली झाली
आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली. महाराष्ट्राच्या दृष्टीने सुटका झाली, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. नागपूर विमानतळावर ते बोलत होते.
इज्जत वाचवण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
आनंदाची बाब
राज्यपालांचा राजीनामा झाला आहे अतिशय आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालाचा राष्ट्रपतींनी राजीनामा मंजूर केला हे बरं झालं. राज्यपाल राष्ट्रपुरुषांच्याबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होते. आता नवीन राज्यपाल आले ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.
महाराष्ट्राचा मोठा विजय!
महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाही यांचा सातत्याने अपमान करणाऱ्याला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही!, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका
रोहित पवार यांनी ट्विट करुन कोश्यारींना महाराष्ट्रद्वेष्टा म्हटले आहे. उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका झाल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस यांचं अभिनंदन करत त्यांच्याकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. राज्यपाल बैस संविधानाचा मान ठेवतील आणि राज्याची अस्मिता जपण्यासोबतच महान व्यक्तींचा अनादर न करता सन्मान राखतील, अशी अपेक्षा, रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करुन नवीन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत.