Monday, April 29, 2024
Homeराजकीयविरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी गुन्हा दाखल-फडणवीस यांची टीका

विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी गुन्हा दाखल-फडणवीस यांची टीका

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar )यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचे तीव्र पडसाद मंगळवारी विधानसभेतही उमटले. आम्ही सरकारचे घोटाळया मागून घोटाळे बाहेर काढत आहोत. त्यामुळे विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis )यांनी विधानसभेत केली.

- Advertisement -

विधानसभेत कामकाजाला सुरूवात होताच देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रवीण दरेकर आक्रमकपणे सरकारविरोधात लढत आहेत. त्यांचा आणि विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आम्ही अजिबात घाबरत नाही, असे फडणवीस म्हणाले. सरकारने अशी कितीही कारवाई केली तरी आमचा आवाज बंद करता येणार नाही. या कारवाईच्या विरोधात न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला.

दरेकर यांच्यावर मजूर नसल्याचा आक्षेप घेत कारवाई करण्यात आली. राज्यातील अनेक आमदार हे मजूर संस्थाचे अध्यक्ष आहेत. त्यांची नावे आता आम्ही देऊ, त्यावर सरकार काय कारवाई करते ते पाहू, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. त्याचवेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर हे जळगावमधील मजूर संस्थेचे अध्यक्ष असल्याचे फडणवीस म्हणाले.

त्याला आमदार अनिल पाटील यांनी आक्षेप घेत देवकर कोणत्याही मजूर संस्थेचे सदस्य नसल्याचा खुलासा केला. त्याचवेळी दरेकर हे ५० कोटींचा बंगला आणि दोन-दोन कोटींच्या गाड्या असलेले मजूर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई योग्य आहे. विरोधक नाहक त्यांच्यावरील कारवाईचे भांडवल करत आहेत, असा आरोप अनिल पाटील यांनी केला. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील धाव घेत दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या