एनएसयुआय कार्यकर्त्यांनी करोनाग्रस्तांची मदत करावी - आ.पाटील

धुळ्यात एनएसयुआयची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक
एनएसयुआय कार्यकर्त्यांनी करोनाग्रस्तांची मदत करावी - आ.पाटील

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महाराष्ट्र काँग्रेस प्रणित एनएसयूआय विद्यार्थी संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी करोनाच्या संकटात संरक्षणाबरोबरच समाजाचेही करोनापासून रक्षण करावे.

करोना काळात पदाधिकार्‍यांनी केलेल्या कामाची दखल निश्चितच वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. समाजामध्ये जाऊन तळागाळातील लोकांसाठी काम करण्याच्या सूचना महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष व आ.कुणाल पाटील यांनी दिल्या.

महाराष्ट्रातील एनएसयुआय विद्यार्थी संघटना तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युवक काँग्रेसची संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पक्षातर्फे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आ. कुणाल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.कुणाल पाटील यांनी राज्यातील एनएसयुआयचे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकार्‍यांची ऑनलाईन बैठक घेतली.

बैठकीत कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी प्रत्येक जिल्हाध्यक्षांचा जिल्हानिहाय संघटनात्मक कामाचा तसेच कोरोना महामारीत कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी आ. कुणाल पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी एनएसयुआयची शाखा असावी, या कामासाठी पक्षातर्फे विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना भक्कम पाठबळ दिले जाईल.

तसेच आजच्या बैठकीत एनएसयूआयचे पदाधिकार्‍यांनी केलेल्या सूचनांचे निश्चितच पक्षाच्या पातळीवर विचार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल.

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे म्हणून काँग्रेसच्या आणि एनएसयूआयच्या प्रत्येक पदाधिकार्‍यांनी स्वरक्षणासह जनतेच्या रक्षणाचे काम करावे. आपल्या कामाची पक्षपातळीवर निश्चितच दखल घेतली जाईल असेही आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यातून 23 जिल्हाध्यक्षांसह 50 पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला होता. बैठकीत एन.एस.यु.आय.चे प्रदेश अध्यक्ष अमीर शेख, प्रदेश सचिव मोहम्मद शयान उस्मान आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक अमीर शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार अभिजित हलदेकर यांनी मानले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com