भाजपच्या 27 बंडखोर नगरसेवकांना नोटीस

सात दिवसाच्या आत म्हणणे सादर करण्याचे नाशिक विभागीय आयुक्तांचे आदेश
भाजपच्या 27 बंडखोर नगरसेवकांना नोटीस
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महानगरपालिकेतील भाजपचे 27 बंडखोर नगरसेवकांसह मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी नोटीस बजाविली आहे.

अपात्र का करु नये अशा आशयाची नोटीस 27 बंडखोर नगरसेवकांना बजविल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात आपले म्हणणे सादर न केल्यास कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा देखील नोटीसद्वारे देण्यात आला आहे. या नोटीस सोबतच सुमारे एक ते दीड हजार कागदपत्रांची छायांकितप्रत देखील देण्यात आली आहे.

जळगाव महापालिकेतील भाजपचे 57 पैकी 27 नगरसेवकांनी बंडखोरी करीत शिवसेनेला पाठींबा दिला. त्यामुळे बहुमतात असलेल्या भाजपला मनपातील सत्ता अवघ्या अडीच वर्षात गमवावी लागली.

दरम्यान, बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर शिवसेनेने सत्ता काबीज केली. भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी भाजप गटनेते भगत बालाणी यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. यात मनपा प्रशासन, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यासह 27 बंडखोर नगरसेवकांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजाविली असून सात दिवसाच्या आत समक्ष हजर राहून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. म्हणणे सादर न केल्यास नियमानूसार त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

नवग्रह मंडळातील नगरसेवकांनी उपमहापौरांच्या दालनात नोटीस स्वीकारली असून अन्य नगरसेवकांना मनपाच्या कर्मचार्‍यांमार्फत नोटीस बजाविण्यात येत आहे. या नोटीसीशिवाय सुमारे एक ते दीडहजार कागदपत्रांची छायांकितप्रत देण्यात आली आहे.

मनपा कर्मचार्‍यांच्या माध्यमातून पोहचविली नोटीस

भाजपतील 27 नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी बंडखोर नगरसेवकांना नोटीस बजाविली आहे. दरम्यान, काही नगरसेवकांनी उपमहापौरांच्या दालनात नोटीस स्विकारली असून अन्य बंडखोर नगरसेवकांना मनपा कर्मचार्‍यांच्या माध्यमातून नोटीस पोहचविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

जिल्हाधिकार्‍यांसह आयुक्तांनाही केले प्रतिवादी

महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन घेण्यात आली होती. यात निवडच्या विशेष सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी उपस्थित होते. मतदान प्रक्रियेत भाजपच्या नगरसेवकांनी निवडणुकीवर हरकत घेतली होती. दरम्यान, भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी 27 बंडखोर नगरसेवकांसह जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनाही प्रतिवादी केले. त्यामुळे त्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, आयुक्तांसह बंडखोर नगरसेवकांना बजावली नोटीस

भाजपचे 57 नगरसेवकांपैकी पहिल्या टप्प्यात 27 नगरसेवकांनी तर दुसर्‍या टप्प्यात 3 नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. त्यानुसार 27 बंडखोर नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी नोटीस बजाविली आहे. त्यासोबतच जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचाही समावेश आहे. यामध्ये नगरसेविका प्रिया जोहरे, सरीता नेरकर, अ‍ॅड. दिलीप पोकळे, रुक्सानाबी खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, मीना सपकाळे, दत्तात्रय कोळी, रंजना सपकाळे, प्रवीण कोल्हे, चेतन सनकत, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, प्रतिभा देशमुख, कुलभूषण पाटील, पार्वताबाई भिल, सिंधूताई कोल्हे, ललित कोल्हे, ज्योती चव्हाण, रेखाताई पाटील, सुरेखा सोनवणे, रेश्मा काळे, मनोज आहूजा, मिनाक्षी पाटील, सुनिल खडके यांना अपात्र का करु नये अशा आशयाची नोटीस बजाविण्यात आली आहे. आता हे नगरसेवक काय खुलासा देतात याकडे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com