Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यापक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचे आश्चर्य नाही - चंद्रकांंत पाटील

पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचे आश्चर्य नाही – चंद्रकांंत पाटील

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

भाजपकडे १०६ आणि विधान परिषद निवडणुकीत १३४ आमदार असताना मुख्यमंत्रिपदावर भाजपचा ( BJP) हक्क होता. मुख्यमंत्री पद मागितले असते तर ते आम्हाला मिळाले असते. मात्र, राज्याच्या हितासाठी आणि हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी पक्षाने बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांला( Shivsainik) मुख्यमंत्री केले. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना मुख्यमंत्री करण्याच्या निर्णयाची आम्हा पाच जणांना माहिती होती. त्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही, असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (BJP state president Chandrakant Patil)यांनी शुक्रवारी केला.

- Advertisement -

एकनाथ शिंदे हे गेली अनेक वर्ष शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारख्यांनी घाम गाळला आहे. सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसेच नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असेही पाटील म्हणाले.

शिवसेनेत बंड करून २० जूनला राज्याबाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी १० दिवसानंतर म्हणजे ३० जूनला मुंबईत येऊन थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. या निर्णयाने भाजपच्या नेत्यांना धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या आमदारांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले. त्यानंतर भाजपने पर्यायी सरकार देण्यासाठी पुढाकार घेतला. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आणि ध्यास आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी लढणारे शिवसैनिक तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला, असे पाटील म्हणाले.

हिंदुत्वाच्या आधारावर स्थापन झालेल्या भाजप – शिवसेना युतीला जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत दिले. परंतु, शिवसेनेच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाला सोडून अल्पसंख्यांकाचा अनुनय करणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केली. त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत हिंदुत्व संकटात आले आणि विकासकामे ठप्प झाली. अशा स्थितीत अंतर्गत कलहामुळे आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपने पर्याय देण्यासाठी पुढाकार घेतला, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार राज्याची विकासकामे गतीने पूर्ण करेल. सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटेल असे काम करेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या