...यापुढे जशास तसे उत्तर : नितेश राणेंचा इशारा

...यापुढे जशास तसे उत्तर : नितेश राणेंचा इशारा

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यात काही शहरात झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या (Raza Academy) कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला असून या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केली.

रझा अकादमीचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर अफवा पसरवत असताना पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता? रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी का दिली? असे सवालही राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. यापुढे हिंदूंवर हल्ले झाले तर त्याला योग्य पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.

रझा अकादमीच्या समर्थकांनी त्रिपुरात (Tripura) धार्मिक स्थळांची तोडफोड झाल्याची खोटी माहिती समाज माध्यमांवर पसरवून मुस्लीम धर्मियांची माथी भडकविली. १२ नोव्हेंबर रोजी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या भित्तिपत्रकातून हिंसाचार घडविण्यासाठी चिथावले गेले.

एवढे सगळे घडत असतानाही राज्याच्या पोलिसांनी रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी दिली. या मोर्चात सहभागी झालेल्या मंडळींनी काही कारण नसताना हिंदू धर्मियांवर हल्ले चढविले, पोलिसांवरही दगडफेक केली. मात्र पोलिसांनी हिंसक जमावाला बळाचा वापर करून रोखले नाही. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse-patil) आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काही नेते या हिंसाचाराबद्दल हिंदुत्ववादी संघटनांना दोष देत आहेत हे धक्कादायक आहे, असे राणे म्हणाले.

२०१२ मध्ये मुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चात झालेला हिंसाचार, भिवंडीत या संघटनेच्या जमावाने पोलीस स्थानकावर हल्ला चढवून दोन पोलिसांची केलेली हत्या या घटनांचेही नितेश राणे यांनी यावेळी स्मरण करून दिले. शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी रझा अकादमीच्या व्यासपीठावर जाऊन केलेल्या भाषणाची चित्रफीत ऐकवत याबद्दल खोतकर यांना का अटक केली नाही? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com