
मुंबई | Mumbai
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण (Sushant Singh Rajput) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ कॉल आल्याचे लोकसभेत सांगितले. ‘AU’ म्हणजे आदित्य ठाकरे, असा दावा राहुल शेवाळेंनी केला.
त्यापाठापोठा कूपर रुग्णालयात सुशांतच्या पोस्टमॉर्टनच्या वेळी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्याने धक्कादायक खुलासा केला. त्यानंतर रुपकुमार शाह तेथे खरच उपस्थित होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रुपकुमार शाह यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे हे प्रकरण आणखीच तापण्याची शक्यता आहे.
नितेश राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,"रुपकुमार शाह सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह घेऊन जात होते, हे स्पष्ट दिसत आहे. त्याच्या शवविच्छेदनाच्या वेळीही शाह तिथे उपस्थित होते. सत्य आता समोर येत आहे. आता बेबी पेंग्विन लांब नाही. न्याय होणारच आहे."
दरम्यान, रूपकुमार शाह हे शवागृहामध्ये कर्तव्यावर होते. त्यामुळे ते या प्रकरणात प्रमुख साक्षीदार मानले जातात. पोस्टमार्टममध्ये बदल केल्याचा गंभीर आरोप शाह यांनी केला होता. पण, या प्रकरणाचा पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास केला. सुशांतने आत्महत्याच केल्याचा निष्कर्ष पोलीस आणि सीबीआयने काढला आहे.