‘त्यांनी’ चिअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो

अहमदनगर (प्रतिनिधी)

निलेश राणे सातत्याने आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असतात. राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. आताही त्यांनी एक वादग्रस्त ट्विट करून पवार समर्थकांचा रोष ओढवून घेतला आहे. सध्या त्यांचे ट्विट सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रीया उमटत आहेत.

कोविड सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी झिंगाट या गाण्यावर कोविड रूग्णांसोबत नृत्य केल्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. भाजपाकडून त्यांच्या या कृत्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

हा व्हिडिओ शेअर करत निलेश नारायण राणे यांनी ‘आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो. स्वत:ची बाजू घेण्यासाठी मी नेहमी जाऊन सेंटरमध्ये नाचतो, असेही सांगतात. नाचा, जेवढे नाचायचंं तेवढं. 2024 पर्यंत नाचून घ्या’ असे ट्विट केले आहे.

गेल्या काही तासांत यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रीया उमटल्या आहेत. पवार समर्थकांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे तर राणे समर्थकही उत्तर देत आहेत. यापूर्वीही पवार-राणे यांच्यात सोशल मिडियावर राजकीय वाद रंगल्याचे दिसून आले आहे.

भाजपाने नोंदवला होता आक्षेप

तत्पूर्वी भाजपनेही आ.पवारांच्या या नृत्यावरून कोविड नियमांचा भंग होत नाही का, असा सवाल केला होता. कोविड सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कृत्यावर भाजपने आक्षेप घेतला होता. कोविड नियमांचे उल्लंघन केले तरी शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून रोहित पवार यांना दुसरा न्याय का?, असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. दरम्यान, रूग्णांचा आनंद द्विगुणित करण्यात गैर काय, असा प्रतिसवाल आ.पवार यांनी त्यांना केला होता.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये ‘झिंगाट’ गाण्यावर आ.रोहित पवार नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी ते कोविड रूग्णांसोबत ठेवा धरताना दिसतात. पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले, डान्स केला. त्यामुळे ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकतात. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का? कुणीही लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा नेता, त्यांनी करोना नियमांच गांभीर्य आणि भान ठेवलंच पाहिजे, असा टोला दरेकर यांनी लगावला होता.

त्यावर कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? असे आ.पवार यांनी म्हटले होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *