VIDEO : पवारांच्या मुख्यमंत्रीपदावरून खटके; काँग्रेसच्या मंत्री ठाकूरांना शिवसेनेचे खोचक उत्तर

VIDEO : पवारांच्या मुख्यमंत्रीपदावरून खटके; काँग्रेसच्या मंत्री ठाकूरांना शिवसेनेचे खोचक उत्तर

मुंबई -

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (SHarad Pawar) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) असते तर राज्यातील चित्र वेगळं असतं, असे भाष्य जाहिरपणे करणाऱ्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना सेनेने (Shivsena) खोचक उत्तर दिले आहे. मला तर वाटतं त्यांना युपीएचं (UPA) अध्यक्ष करावं, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल, असा टोला डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी ठाकूरांना लगावला आहे.

दरम्यान, यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) खटके उडण्याची चिन्हे आहेत. आघाडीतील वरिष्ठ नेते वादग्रस्त मुद्यांवर संयम बाळगत असले तरी दुसऱ्या फळीतील नेते या मुद्यांवर एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

अमरावतीच्या (Amravati) कार्यक्रमात ना. ठाकूर यांनी जाहिरपणे पवारांच्या मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले. विशेष म्हणजे शरद पवार यावेळी मंचावर होते. त्यामुळे या विधानानंतर राजकीय चर्चांना ऊत आला आहे. शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

त्यानंतर पुन्हा बोलताना, टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. पावरांसाठी जोरात टाळ्या वाजवा, असं त्या म्हणाल्या. चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. पवार आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार, असा दावाही यशोमती ठाकूर यांनी केला.

काँग्रेसच्या (Congress) मंत्री यशोमती ठाकूर यांना शिवसेनेने उत्तर दिले आहे. पक्षाच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक व्हिडीओ जारी केली. शरद पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाहीय. मला तर वाटतं त्यांना युपीएचं अध्यक्ष करावं, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल, असा टोला गोऱ्हेनी लागवला आहे. यशोमतीताई तुम्ही असा प्रस्ताव द्याल का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

दरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या उत्तरावर बोलतांना मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मला असं वाटतं की, माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांचा राजकीय वकुब यांची महाराष्ट्राला नितांत आणि नेहमीच आवश्यकता राहिलेली आहे. महाराष्ट्र राज्याला आणि आम्हाला मार्गदर्शक म्हणून ते हवेच आहेत. किंबहुना सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची देखील हीच भूमिका असेल. यांचा अर्थ उद्धव ठाकरे साहेब आम्हाला नको आहेत किंवा त्यांच्यावर टीका केली असा होत नाही. ज्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात येत होती, त्यावेळी अनेक तर्कवितर्क काढण्यात येत होते. मात्र त्यावेळेस मी हे म्हटलं होतं, या वाक्यांची मी कालच्या भाषणात आठवण करून दिली. बस्स एवढंच! आणि तेवढाच त्याचा संदर्भ आणि अर्थ देखील आहे. या वाक्याचा वेगळा अर्थ काढून या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे भासवून राजकीय वाद निर्माण करण्यात विरोधकांना रस आहे. मात्र आम्ही कुणीही त्याला बळी पडणार नाही. असे छोटे मुद्दे उपस्थित करून महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी अभेद्य आहे.

तसेच, महत्वाचा मुद्दा असा की,आमचे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून अतिशय कार्यक्षमपणे काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. त्यांनी आतापर्यंत अतिशय उत्तम काम केले आहे आणि करीत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सोबतच महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्हाला पितृतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या पवार साहेबांचे गुणगान करताना बोलल्या गेलेल्या शब्दांचा कुणी गैर अर्थ काढू नये, एवढंच प्रांजळपणे सांगते. असं त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.