नगराध्यक्ष वहाडणे विकास कामात गैरप्रकार करतात हे पुराव्यासह सिध्द करू

jalgaon-digital
2 Min Read

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

नगराध्यक्ष वहाडणे यांनी नगरसेवकांना पोकळ धमक्या देण्याऐवजी जो कोणी कामात गैरप्रकार करत असेल त्यांचे पुरावे द्यावेत

अन्यथा नगराध्यक्ष वहाडणे यांनी कोणत्या कामात गैरप्रकार केले याचे पुरावे आम्ही देतो असा गंभीर आरोप उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी भाजपा नेते पराग संधान, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, विजय वाजे, विजय आढाव, कैलास जाधव, बबलू वाणी, वैभव गिरमे, दत्ता काले, बाळासाहेब नरोडे, बापू पवार, श्री आढाव, अविनाश पाठक, सागर जाधव, जनार्धन कदम, शिवाजी खांडेकर, कुरेशी आरिफ, संदीप देवकर, पिंटू नरोडे, विवेक सोनवणे, रवी रोहमारे, पप्पू पडियार, रंजन जाधव, योगेश बागुल आदींसह मोठ्याप्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपनगराध्यक्ष निखाडे म्हणाले, आम्हाला नगराध्यक्षांवर भरवसा नसून आमच्या नावाने त्यांनी ठराव सादर केलेले आहेत. पालिकेचे सर्व टेंडर आपल्या सोईच्या ठेकेदाराला दिले जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या कामाच्या उद्घाटनाला आम्हाला बोलावले होते का? हे त्यांनी शपथ घेऊन सांगावे असे आव्हानही दिले.

पराग संधान म्हणाले, गेल्या चार वर्षांत भाजपा नगरसेवकांनी एकही विषय नामंजूर केलेला नाही. सगळे विषय शहर हिताचे मंजूर केले आहेत. ज्यात पैशाचा अपव्यय होतो तेच नामंजूर केले आहेत. शहरविकासाचे महत्त्वाचे विषय त्यांना मिटिंग मध्ये घ्यायला लावले, पण ते जाणूनबुजून घेतले जात नाहीत, पालिकेतील निधी हा 14 वा वित्त आयोग, रस्ता अनुदान व नगर पालिका निधी असून याचे श्रेय कोणीही घेऊ नये.

शहरातील विकासकामांना ज्यांनी निधी दिला नाही ते फक्त उद्घाटन करत फिरत आहेत. ज्यांनी टेंडर काढले ते शब्द बोलत नाहीत तर राष्ट्रवादीच्या पोटात गोळा उठून त्यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. यात जास्त वाईट कोणाला वाटलं हे कळत नाही. तीन दिवसांत एक शब्द न बोलता व्हॉट्स अ‍ॅप नेते अद्यापही गप्प आहेत. नगराध्यक्ष यांनी किमान राष्ट्रवादी नेते मंगेश पाटील यांचे सल्ले घेऊन काम करावे, असा सल्ला दिला आहे.

कैलास जाधव म्हणाले, गावाचा विकास करायचा आहे तर मुख्यमंत्र्यांना भेटून आम्हीही कामे मंजूर करून आणू. मात्र नगराध्यक्ष स्वतःच्या मनाचेच करतात. नगराध्यक्षांना काम करायचे नाही. संपूर्ण रस्त्यांच्या कडेला पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे गौडबंगाल अद्यापही कळायला तयार नाही,असेही जाधव यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *