Thursday, April 25, 2024
Homeराजकीयखतांसह पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

खतांसह पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

रासायनिक खतांच्या किंमतीत जी दरवाढ झाली आहे ती कमी करावी, देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी, या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

- Advertisement -

त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील,उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, सरचिटणीस अशोक पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी आदींनी निवेदन दिले.

यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व शेतमशागतीच्या कामांना शेतकर्‍यांकडून गती देण्यात आली आहे. पेरणीसाठी लागणार्‍या बी- बियाणे, खतांसाठीच्या आर्थिक बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकर्‍यांकडून तयारी केली जात आहे.

परंतु केंद्र शासनाकडून रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात व येत्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे.

खते व बियाण्यांच्या विक्रीत, किंमतीत, पुरवठ्यात मोठा काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी. त्याचप्रमाणे देशात झालेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढ ही सुद्धा कमी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी करीत मोदी सरकारचा निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष मंगर्ला पाटील, युवक महानगराध्यक्ष स्वप्निल नेमाडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, युवक प्रदेश सचिव संदीप पाटील, संजय चव्हाण, सुशील शिंदे, धवल पाटील, रॉकी पाटील, अमोल कोल्हे, अनिल खडसे, हर्षल वाघ, भूषण पवार, योगेश नरोटे, कामरान शेख आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या