
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या पदांची अदलाबदल करावी, अशी भाजपची इच्छा असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे...
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्ट्रो (Clyde Crasto) यांनी याबाबत एक ट्विट केल्याने चर्चांना उधाण आले आहे. क्रास्ट्रो यांनी एक ट्वीट करत म्हंटले आहे की, "हे पण खरं आहे का? श्री. एकनाथ शिंदे यांनी कामावरून तीन दिवसांची सुट्टी घेतल्याची बातमी आहे. मीडियातील सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांनी नाराज होऊन सुट्टी घेतली आहे. कारण भाजपची इच्छा आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये आपल्या पदाची अदलाबदल करावी.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 3 दिवसांची सुट्टी घेतल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदाची अदलाबदल होणार म्हणून नाराज मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घेतली का? असा सवाल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर मुख्यमंत्र्यांची खूर्ची जाणार हे नक्की असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आगामी निवडणूकांसंदर्भात मोठे विधान केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत आहेत.