मुंबई | Mumbai

सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajnay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आरोपांनंतर भारतीय जनता पक्षानेही आक्रमक पवित्रा घेत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करुन मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणीही केली आहे. तसेच आज सकाळपासूनच धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार बोलतांना म्हणाले, “धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते, त्यातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेसनमध्ये तक्रार झाली आणि आता चौकशी प्रक्रिया सुरु झाली असेल. हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तीगत हल्ले होतीलअसा अंदाज असावा म्हणून आधीच त्यांनी हायकोर्टात जाऊन आपलं म्हणणं मांडलं असेल. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. तसेच “त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आहे. मुंडे यांनी मला सखोल आणि सविस्तर माहिती दिली असून ती इतर सहकाऱ्यांना सांगणं माझ कर्तव्य आहे. त्यांचं मत घेऊन पुढील पाऊलं टाकलं जातील. याला जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ,” अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.

पुढे ते म्हणाले की, “राजकारण होतंय का यावर मी जास्त भाष्य करणार नाही. मी देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य वाचलं. त्यांनी यामध्ये संयमाने जाण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पक्षप्रमुखांचं हे मत असेल आणि इतरांचं दुसरं असेल तर अशा परिस्थितीचा फायदा विरोधकांकडून केला जात आहे याबद्दल अधिक सांगायची गरज नाही”.

नवाब मलिकांवर व्यक्तिगत आरोप नाही

नवाब मलिक यांच्यावर व्यक्तिगत आरोप नाही, आरोप त्यांच्या जावयांवर आहे. अटकही झाली असून तपास यंत्रणेला सहकार्य करणं आणि वस्तुस्थिती समोर आणणं गरजेचं आहे. तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना संबंधितांकडून सहकार्य होईल याची खात्री आहे. गेली अनेक वर्ष नवाब मलिक राजकारणात आहेत. पण त्यांच्यावर कधीच आरोप झालेला नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान पोलिस स्टेशन मध्ये आज पीडीत महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तर धनंजय मुंडे यांनी बलात्काराचे आरोप फेटाळत हे ब्लॅकमेलिंग होत असल्याचं काही दिवसांपूर्वी फेसबूक पोस्ट द्वारा स्पष्ट केले आहे.