Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या५ रुग्णांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग आली नाही; ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर...

५ रुग्णांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग आली नाही; ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे ट्विट

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातूनच एक धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील १३ रुग्ण आयसीयूमधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. याआधी पाच दिवसांपूर्वीच इथे एका रात्रीत ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अपुऱ्या आरोग्य सुविधा, गोंधळ आणि डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफची कमी संख्या यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या प्रकाराची दखल घेत ट्वीट केलं आहे. शरद पवारांनी मृत्यू झालेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली असून यासोबतच प्रशासनाला देखील सुनावलं. ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल रात्रभरात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही हि अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. असे शरद पवार म्हणाले आहेत.

एका रात्रीत १७ रूग्ण दगावल्याच्या वृत्ताला रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने, तर काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. १० ऑगस्टला एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. आता केवळ रात्री १०.३० पासून सकाळी ८.३० पर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या