
कोल्हापूर | Kolhapur
आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नसल्याचे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. २०२४ मधील विधानसभा (Assembly Elections) आणि लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत, असं पवार म्हणाले.
एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.
अनेक राज्यपाल पाहिले पण...
शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अनेक राज्यपाल या राज्यात पाहिले आहेत, त्यांनी राज्याच्या हिताचे मार्गदर्शन केले. मात्र हे राज्यपाल सतत वादग्रस्त व्यक्तव्य करतात. त्या पदाची प्रतिष्ठा कोश्यारी यांच्याकडून राखली जात नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांनी जमिनीवर पाय ठेऊन राहायचं
शरद पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे.ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांनी जमिनीवर पाय ठेऊन राहायचं असतं. मात्र काही लोक हे टोकाची भूमिका घेत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी पवार यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत दोन गट पडले हे खरं आहे. मात्र कडवा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान महाविकास आघाडी एकत्रित पाऊले टाकत असून, आणखी काही गटांना सोबत घेण्याची चर्चा सुरू असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
विरोधकांच्या ऐक्यासाठी राहुल यांच्या पदयात्रेची मदत होईल
तसेच यावेळी पवार यांनी यात्रेबाबत भारत जोडो यात्रेबाबत सूचक विधान केलं आहे. ते बोलताना म्हणाले, राहुल गांधींविषयी सत्ताधारी भाजपने कायमच टिंगलटवाळी केली. मात्र राहुल यांनी भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम हाती घेतली. त्यावरही सुरुवातीला टीका झाली. मात्र हा कार्यक्रमात केवळ काँग्रेस पक्षाचाच आहे, असं काही मर्यादित ठेवलं नाही. सर्व पक्ष या यात्रेत सामील झाले. महात्मा गांधींच्या विचारांनी काम करणाऱ्या संस्था यात सामील झाल्या होत्या. विशेष म्हणजे, भारत जोडो यात्रेत सामान्य माणूस देखील पोहोचला होता. यात्रेला सामान्यांची सहानुभुती होती. या यात्रेमुळे भाजपला प्रत्युत्तर मिळाल्याचं पवार यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या विधानाची दखल घेण्याची गरज नाही
राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीयवाद निर्माण झाला आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरे यांच्या या आरोपावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या विधानाची दखल घेण्याची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे काही आरोप करू शकतात. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष कोण होते त्याची यादी पाहा. भुजबळ होते. पिचड होते. अनेक लोकं होते. ते कोणत्या समाजाचे होते सर्वांना माहीत आहे. ती नावे सांगायची गरज नाही, असा चिमटा शरद पवार यांनी राज ठाकरे यांना काढला. जातीचा विषय आमच्या मनात येत नाही. आम्ही सर्व शाहू फुले आंबेडकरी विचाराचे लोक आहोत. त्यामुळे कोणी काही टीका केली तर आम्ही त्याची दखल घेत नाही, असं शरद पवार म्हणाले.
अमित शाहांना टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुवाहाटी येथे बोलताना नुकतीच एक घोषणा केली होती. १ जानेवारी २०२४ पर्यंत अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण होईल, असे अमित शाह यांनी सांगितले होते. यावरुन शरद पवार यांनी शाह यांना चिमटा काढला. राम मंदिराचे काम पूर्ण कधी होणार, याची घोषणा एखाद्या पुजाऱ्याने करायला हवी होती. परंतु, ती घोषणा देशाच्या गृहमंत्र्यांनी केली. सामान्य नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांवरुन लक्ष्य विचलित करण्यासाठीच अमित शाह यांनी ही घोषणा केल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.