टीका करताना दरेकरांची जीभ घसरली; राष्ट्रवादीकडूनही जोरदार पलटवार

टीका करताना दरेकरांची जीभ घसरली; राष्ट्रवादीकडूनही जोरदार पलटवार

मुंबई | Mumbai

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १६ सप्टेंबरला सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

दरम्यान सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करताना घसरली आहे. प्रवीण दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना आक्षेपार्ह्य वक्तव्य केले आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांना खडे बोल सुनावले आहेत. आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येते. हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांच्या कैवारी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, आज मला त्यांची कीव येते. त्या अशा पक्षात काम करत आहात, ज्यांच्या पक्षाचा हा विचार आहे. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे, ती दिसून आली. ज्या प्रकारचे वक्तव्य प्रवीण दरेकर तुम्ही केले त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते, याची जाणीव ठेवावी. प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना टीका केली. पण त्या टीकेची पातळी खालच्या दर्जाची होती. त्यांनी आक्षेपार्ह्य भाषा वापरलेली असल्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाला आहे, त्यांना चांगलीच शिक्षा देऊ, असा पलटवार राष्ट्रवादीने केला आहे.

काय म्हटलं होत प्रवीण दरेकरांनी?

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com