“पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी...”; रोहित पवारांचा नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल

“पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी...”; रोहित पवारांचा नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल

मुंबई | Mumbai

अमरावतीतलं उमेश कोल्हे हत्या प्रकरण ताजं असतानाच नुपूर शर्मा यांचा डीपी ठेवला म्हणून कर्जतमध्ये एका तरूणाची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

उदयपूर, अमरावतीनंतर आता अहमदनगर येथे हिंदुंवर हल्ला झाल्याचं राणे यांनी सांगितलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ( Rohit Pawar News)

'सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या कर्जतच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत व पुढंही घडणार नाहीत. कारण संतशिकवणीनुसार वागणारी माणसं इथं आहेत. त्यामुळं या भूमीबाबत प्रत्येकाने योग्य माहिती घेऊनच बोलावं. आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. भंडाऱ्यात अत्याचार झालेली महिला आज मृत्यूशी झुंज देतेय, परंतु याबाबत आवाज उठवायला 'आमचं हिंदुत्व' कधी जागृत होत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'आमचा' तिसरा डोळा कधी उघडत नाही. पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मात्र आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका आहे.' असं ट्वीट करत रोहित पवारांनी नितेश राणे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?

देशात शरिया कायदा लागू झालेला नाही, जर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा राणेंनी दिला. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार राहिलं नाही, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत, हिंदूंना टार्गेट केलंत, तर जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं, असा स्पष्ट संदेश मला द्यायचाय, असं नितेश राणे म्हणाले.

आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तरी आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचं ऐकलंय का? पण तुम्ही तशी पावलं उचलत असाल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी उत्तर द्यावं लागेल, हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल, आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करु नका, असा खुला संदेश द्यायचा असल्याचं नितेश राणे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com