NCP Crisis : शरद पवारांना धक्का? आणखी एका खासदार आणि आमदाराचे अजितदादांना समर्थन?

NCP Crisis : शरद पवारांना धक्का? आणखी एका खासदार आणि आमदाराचे अजितदादांना समर्थन?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा पक्षात हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांनी बंड केलं त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले. अशातच पुन्हा एकदा शरद पवार गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवार गटाला असल्याची चर्चा सुरू आहे. ते आमदार आणि खासदार कोण याबाबत तर्कवितर्क काढण्यास सुरुवात झाली आहे.

या खासदार आणि आमदाराने त्यांची प्रतिज्ञापत्रे अजित पवारांच्या गटाकडे दिल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार यांना सोडून जाणारा लोकसभेतील खासदार आणि विधानसभेतील आमदार एकाच जिल्ह्यातील आहेत. दोघांमध्येही घट्ट मैत्री आहे. दोघांनी चर्चा करून, विचारविनिमय करून अजितदादांना साथ देण्याची भूमिका घेतलेली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं वारं ओळखून, आपल्याला अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, यावर त्यांचं एकमत झाल्याने दोघांनीही आपापली प्रतिज्ञापत्र अजित पवार यांना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीये.

अजित पवार गटाकडून नुकतीच शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा अशी मागणी विधीमंडळ कोर्टमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाला समर्थन करणारा हा खासदार आणि आमदार सध्या शरद पवार गटामध्ये असला तरी योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे संबंधित आमदाराला आमदाराला वगळून अजित पवार गटाकडून उर्वरीत 10 आमदारांविरोधात विधीमंडळात कारवाईसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

शरद पवार गटाकडील खासदार

  • श्रीनिवास पाटील

  • सुप्रिया सुळे

  • डॉ. अमोल कोल्हे

  • वंदना चव्हाण

  • फौजिया खान

शरद पवार गटातील आमदार

  • जयंत पाटील

  • जितेंद्र आव्हाड

  • रोहित पवार

  • सुमन पाटील

  • अशोक पवार

  • सुनील भुसारा

  • प्राजक्त तनपुरे

  • बाळासाहेब पाटील

  • अनिल देशमुख

  • राजेश टोपे

  • संदीप क्षीरसागर

यादरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून शरद पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाने पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत शरद पवार गटातील आमदारांना तात्काळ आपात्र करा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या या मागणीनंतर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटात राजकारण तापण्याची शक्यता असून यावर शरद पवार गट काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com