
मुंबई | Mumbai
भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रसाद लाड यांचा खरपूस समाचार घेतलाय. लाड यांना चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, अशी उपहासात्मक टीका करतानाच हसावे की रडावे या पलिकडील उद्विग्नता आहे म्हणत अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला.
“काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा?
टीपः- हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे.. निषेध किंवा धिक्कार करणे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार!,” असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
दरम्यान काल मुंबईतील कोकण महोत्सावात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी हे विधान केले. 'स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापन छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, त्यांची सुरूवात कोकणात झाली, असं आमदार प्रसाद लाड बोलत असल्याचे दिसत आहे.