Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या“कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन, या सरकारला काही...”; तलाठी परीक्षेवरून रोहित...

“कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन, या सरकारला काही…”; तलाठी परीक्षेवरून रोहित पवार संतापले

मुंबई | Mumbai

तलाठी भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळ काही संपण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता आता तलाठी परिक्षा असलेल्या अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने मुलांचा खोळंबा झाला आहे. सकाळी नऊ वाजता पेपर सुरू होणार होता. मात्र परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सर्व्हरचा प्रोब्लेम झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही सरकारचा तीव्र शब्दात समाचार घेतला आहे.

- Advertisement -

रोहित पवार यांनी ट्विट करत, “तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे सोमवारी सकाळी आठ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणे अपेक्षित होते. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबली. या सरकारला काही गांभीर्य आहे की नाही? यात काही काळंबेरे आहे?” असा आरोप करत सरकारच्या कारभाराचा पवारांनी समाचार घेतला आहे.

Talathi Exam : सर्व्हर डाऊनमुळे खोळंबा, तलाठी भरती परिक्षेच्या पेपरची वेळ बदलली

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारचं असं बेजबाबदार वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. परीक्षेतील विद्यार्थ्यांनी निराश होऊन टोकाचं पाऊल उचलल्यास राज्य सरकार जबाबदार असणार आहे. राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रे सुरू करण्याची आवश्यकता होती. त्याऐवजी, सरकारने फक्त चार केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दूरवरच्या अंतरावर जाण्यास भाग पाडलं. परीक्षेला बसण्यासाठी लांबचा प्रवास करण्यास भाग पाडले. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी खूप मेहनत घेतली. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राज्य सरकारनं परीक्षा शुल्क म्हणून प्रति उमेदवार एक हजार रुपये आकारले आहेत. आता, या उमेदवारांचे काय होणार? सरकारने तलाठी भरती परीक्षा दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरविले तर पुन्हा परीक्षा शुल्क आकारू नये, असे वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला आवाहन केले.

राज्यभरातून तलाठी पदाच्या 4 हजार 600 जागांसाठी 10 लाख 53 हजार उमेदवार बसले आहेत. गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 45 टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. ही परीक्षा सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि दुपारी 4.30 ते 6.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. ही परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेतली जाणार आहे. तलाठी पदासाठी एकूण 200 गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या