
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत.
याशिवाय ठाण्यातील मुंब्र्यात एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतल्यामुळं आव्हाड यांच्या अडचणी वाढलेल्या आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांसोबत छोटीशी दुर्घटना घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
४ फेब्रुवारी रोजी मुंब्रामध्ये आमदार प्रीमियर लीगचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड येथे उपस्थित होते.आव्हाड स्टेजवर आले असता ते स्टेजवरील खुर्चीत बसणार इतक्यात स्टेजचा काही भाग खचला.
आव्हाडांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सावरलं त्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र आव्हाडांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानभवनातून बाहेर पडून पायऱ्या उतरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पडता पडता वाचले. मात्र, त्यांच्यासोबत चालणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना हात देत सावरले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायऱ्यांवरून पडता पडता वाचले. याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.