Tuesday, April 23, 2024
Homeराजकीय'आंदोलनजीवी' कोण हे ठरवायचं झाले तर काटा हा भाजपकडेच !

‘आंदोलनजीवी’ कोण हे ठरवायचं झाले तर काटा हा भाजपकडेच !

मुंबई l Mumbai

सोमवारी, राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देतानाच शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरही भाष्य केलं. या भाषणात त्यांनी ‘आंदोलनजीवी – एक नवी जमात’ म्हणतानाच या जमातीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -

दरम्यान, पंतप्रधानांनी ‘आंदोलनजीवी’ या शब्दाचा वापर केला आणि त्यावरुन आता देशभरात राजकारण तापलं आहे. यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ‘आंदोलनजीवी’ या शब्दावरून भाजपला टोला लगावला आहे.

छगन भुजबळ बोलतांना म्हणाले की, ‘आंदोलने ही जगभर होत आहेत. आपल्या देशाला आंदोलनं नवीन नाहीत. भाजपा सत्तेत नसताना त्यांचे रोज काही ना काही आंदोलन असायचे. बांगड्या घेऊन जाणे, रिकामे हंडे घेऊन जाणे, रस्त्यात बसणे अशा अनेक गोष्टी त्यांनी (भाजप) केल्या आहेत. लोकशाहीमध्ये सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसल्यास त्याविरोधात पत्र पाठवणे, निषेध करणे आणि आंदोलने करणे, हे होत असते. अशा गोष्टींना हिणवणे योग्य नाही. आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झाले तर त्याचा काटा भाजपाकडेच झुकतो, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान?

सोमवारी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देतानाच शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरही भाष्य केलं होत. यावेळी ते बोलतांना म्हणाले की, ‘श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत तसेच आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात, आपल्याला अशा लोकाना ओळखायला हवं. हे लोक सर्व ठिकाणी जाऊन वैचारिक भूमिका मांडत असतात, लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत असतात. नवनव्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे देशानं अशा आंदोलनजीवी लोकांपासून सावध रहायला हवं. त्यांना स्वतःला नीट उभं राहता येत नाही ते दुसऱ्याच्या आंदोलनात जाऊन बसतात, हीच त्यांची ताकद आहे. हे सर्व आंदोलनजीवी परजीवी असतात. आपण जिथे जिथे सरकार चालवत असाल तुम्हाला अशा परजीवी आंदोलनकर्त्यांचा अनुभव येतच असेल, अशा शब्दांत मोदींनी विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणाऱ्यांना सुनावले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या