पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ट्विटरवॉर..

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ट्विटरवॉर..

मुंबई | Mumbai

राज्यात करोनाचा कहर वाढत आहे. करोना प्रतिबंधासाठी अनेक उपययोजना लागू केलेल्या असल्या तरीही आकडे वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

त्यातच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाल्याकडे लक्ष वेधलं. तसेच त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. यावर आता धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील लस उपलब्धतेची नेमकी माहिती देतानाच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना सणसणीत टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी म्हंटल आहे की. 'अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत, त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्यात, हे काहींना ज्ञात नसेल. बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो.' अशी टीका त्यांनी केली.

तसेच, 'जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 व कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल!' असेही ते म्हणाले.

त्याच बरोबर 'जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा, पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको. कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे, मा. आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये?' असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना टॅगही केलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या सडेतोड उत्तरानंतर पंकजा मुंडे यांनी देखील पलटवार केला आहे. पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे की, 'राज्याच्या भल्यासाठीPM,जिल्ह्याच्याCM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा.तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही.विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा,उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी टोला लगावला आहे.

पंकजा मुंडेंनी पत्रात काय म्हटलंय –

'बीड जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ३४ हजार ९८९ असली, तरी त्यातील ३० हजार ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. तर दुसरीकडे करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे,' असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com